नातालमध्ये जपान आणि दहा सदस्यीय ग्रीस यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरी सुटल्यामुळे कोलंबियाला २४ वर्षांनंतर प्रथमच फिफा विश्वचषकातील दुसऱ्या फेरीचा मार्ग मोकळा झाला.
ग्रीसचा कर्णधार कोन्स्टान्टीनस  कॅट्सॉरानीसला दुसऱ्यांदा ताकीद मिळाल्यामुळे ३८व्या मिनिटाला मैदानाबाहेर जावे लागले. तरीही जपानला याचा फायदा उठवण्यात अपयश आले. ‘क’ गटातील जपान आणि ग्रीसचे आता प्रत्येकी एकेक सामने शिल्लक असून, अजूनही त्यांना दुसऱ्या फेरीची आशा राखता येऊ शकते. ग्रीसचा अखेरचा सामना आयव्हरी कोस्टशी होणार आहे. आयव्हरीच्या खात्यावर तीन गुण जमा आहेत. याचप्रमाणे जपान कोलंबियाशी भिडणार आहे. कोलंबियाने सहा गुणांसह आपले बाद फेरीतील स्थान पक्के केले आहे.
जपानचे प्रशिक्षक अल्बटरे झ्ॉचेरोनी यांनी आघाडीवीर शिंजी कागावाला आयव्हरी कोस्टविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे संघात स्थान दिले नाही. यंदाच्या हंगामात मँचेस्टर युनायटेडकडूनही त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही.