दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. या काळात त्यांना कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास मनाई होती. पण त्यांच्या शिक्षेचे १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र विश्वचषक स्पर्धेसाठी या दोघांना संघात स्थान देण्यात आले. स्मिथने पहिल्याच सराव सामन्यात यजमान संघाविरुद्ध दमदार शतक ठोकले. पण मधल्या १ वर्षाच्या बंदीच्या काळात स्टीव्ह स्मिथ नक्की काय करत होता? याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. त्याबाबत स्टीव्ह स्मिथने उत्तर दिले.

“माझ्याकडे एका वर्षाचा कालावधी होता. या कालावधीत मला अशा काही गोष्टी करायच्या होत्या, ज्या मी आधी फार वेळा किंवा कधीच केलेल्या नव्हत्या. पण ही बाब माझ्या पथ्यावर पडली. मला माझ्या बलस्थानांचा विचार करायला पुरेसा वेळ मिळाला. शांतपणे घर बसून आपल्याला काय जमते याचे मी आत्मपरीक्षण केले”, असे स्मिथ म्हणाला.

“गेल्या वर्षभरात मला खूप काही शिकायला मिळाले. मी टीव्ही आणि रेडिओवर माझ्या बाबतीत बऱ्याच गोष्टी ऐकल्या. त्या सर्व गोष्टींमुळे माझे डोळे उघडले. मला त्या दिवशी कळून चुकले की मी जे काही केले, त्याचा इतरांच्या जीवनावरही परिणाम झाला होता. मी काही प्रमाणात समाजसेवा केली. मी एक चांगली व्यक्ती म्हणून गेल्या वर्षभरात स्वतःला सापडलो, हे मी नक्की सांगू शकतो”, असेही स्मिथने सांगितले.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांची प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर लादलेल्या एक वर्षांच्या बंदीनंतर या दोन्ही खेळाडूंचे नुकतेच ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले. शनिवारच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याच्यासमवेत दुसरा सलामीवीर म्हणून वॉर्नर जेव्हा मैदानावर दाखल झाला, त्यावेळी एका प्रेक्षकाने ‘फसवेगिरी करणारा वॉर्नर तू बाहेर निघ’ अशा स्वरूपाची घोषणा दिली. तसेच वॉर्नर मैदानावर येताच तोंडातून आवाज काढत प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली. त्यानंतर दोन गडी बाद झाल्यानंतर स्मिथ जेव्हा खेळायला आला, त्यावेळी त्यालादेखील ’चीट, चीट, चीट’ करून चिडवण्यात आले. स्मिथने प्रथम ५० आणि नंतर १०० धावा केल्यानंतरही काही प्रेक्षकांनी आवाज काढत त्याची चेष्टा केली.