भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या प्रंचड फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशचा पराभव करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान भारतीय संघ साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंका संघाविरोधात खेळणार आहे. शनिवारी हा सामना पार पडणार आहे. श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघ क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसेल. तसंच भारत उपांत्य फेरीत पोहोचला असल्याने अजून एक सामना खेळणार आहे. या सामन्यांमध्ये रोहित शर्माकडे एक, दोन नाही तर तीन वर्ल्ड रेकॉर्ड वाढण्याची संधी आहे.

रोहित शर्माने बांगलादेशविरोधात केलेल्या १०४ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळालं. या विश्चचषक स्पर्धेत रोहित शर्माने ९०.६६ च्या सरासरीने आणि ९६.९६ च्या स्ट्राइक रेटने ५४४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

रोहित शर्माने चार शतकं ठोकली असून भारताचे साखळी फेरीतील एक आणि उपांत्य फेरीमधील एक असे दोन सामने खेळणं नक्की आहे. या सामन्यांमध्ये मोठी खेळी करत तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी रोहित शर्माकडे आहे.

पहिला रेकॉर्ड – एका वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त शतक
रोहित शर्माने या विश्चचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरोधात सर्वात पहिलं शतक ठोकलं. यानंतर पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात शतक करत त्याने माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा तीन शतकांचा रेकॉर्ड तोडला होता. यासोबतच त्याने विश्वचषकात सर्वात जास्त शतकं करण्याच्या कुमार संगकाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. यामुळे आता अजून एक शतक ठोकत सर्वाधिक शतकं करण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावे होऊ शकतो.

दुसरा रेकॉर्ड – विश्वचषकात सर्वात जास्त धावा
विश्चचषकात सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने २००३ च्या विश्चचषकात ६७३ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये ९०.६६ च्या सरासरीने ५४४ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजून दोन सामने खेळणार असल्या कारणाने अजून १३० धावा करत रोहित शर्माला वर्ल्ड कपमध्ये सर्वांधिक धावांचा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

तिसरा रेकॉर्ड – विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वात जास्त धावा
भारत साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंकेविरोधात खेळणार आहे. रोहित या सामन्यात ४३ धावा करत विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड करु शकतो. सध्या सचिन तेंडुलकर (५८६) आणि मॅथ्यू हेडन (५८०) या यादीत अव्वल आहेत. रोहित शर्माच्या सध्या ५४४ धावा आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (५१६) आणि एरॉन फिंच (५०४) देखील या स्पर्धेत आहेत.