विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माने विश्वचषकात पाच शतके झळकावत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. या सर्वांचे श्रेय रोहित शर्माने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला दिले आहे. युवराजच्या मार्गदर्शनामुळे विश्वचषकात सातत्याने धावा करू शकलो असे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले.

‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये माझा सूर काहीसा हरवला होता. त्या वेळी युवराज सिंगने मला मोलाचे मार्गदर्शन करून गरजेच्या वेळी तूच भारतासाठी धावा करशील, असे सांगितल्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला व मी विश्वचषकात सातत्याने धावा करू लागलो, अशी प्रतिक्रिया भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली.’

विश्वचषकापूर्वी झालेल्या ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने फक्त दोन अर्धशतकांसह ४०५ धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत पाच शतके झळकावून रोहितने जोरदार पुनरागमन केले. या कामगिरीमागे युवराजच्या सल्ल्याचा मोठा वाटा आहे, असे रोहितने सांगितले.

‘‘संपूर्ण ‘आयपीएल’मध्ये आम्ही दोघांनी एकमेकांच्या कामगिरीविषयी चर्चा केली. युवराज माझ्या थोरल्या भावासारखा आहे. त्यामुळे आम्ही खेळाव्यतिरिक्त अन्य खासगी गोष्टींविषयीसुद्धा चर्चा करतो. ‘आयपीएल’दरम्यान मला चांगली सुरुवात मिळत होती, मात्र अर्धशतक झळकावता येत नव्हते. त्यामुळे युवराजने मला सांगितले की, जेव्हा भारताला सर्वाधिक गरज असेल त्या वेळी तू नक्कीच धावा करशील,’’ असे रोहित म्हणाला.

‘‘२०११च्या विश्वचषकापूर्वी युवराजसुद्धा कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत होता. परंतु सचिन तेंडुलकरने त्याला मार्गदर्शन केल्यावर संपूर्ण विश्वचषकादरम्यान आपल्याला युवराजचे जिगरबाज रूप पाहावयास मिळाले,’’ असेही रोहितने सांगितले. २०११च्या विश्वचषकात युवराजने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता.

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत पाच शतके झळकावणे, विक्रम करणे किंवा द्विशतके नोंदवणे, यापेक्षाही विश्वविजेतेपदाला गवसणी घालणे हे माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम यश असेल, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने सामन्यानंतर व्यक्त केली. सचिन तेंडुलकरच्या एका विश्वचषकातील सर्वाधिक धावांच्या विक्रमापासून रोहित २६ धावांच्या अंतरावर आहे. यासंदर्भात रोहित म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगतो की, मी या मुद्दय़ांकडे पाहिलेले नाही. मी येथे विक्रम करायला आलेलो नाही, तर विश्वचषकजिंकणे हेच आमचे प्रमुख लक्ष्य आहे.’’