पुरुष आणि महिला संघाला १७वे, तर मिश्र संघाला १५वे स्थान

जागतिक रिले स्पर्धेच्या ४ बाय ४०० मीटर पुरुष आणि महिला गटात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. दोन्ही संघांना १७व्या स्थानांवर समाधान मानावे लागले. याशिवाय ४ बाय ४०० मीटर मिश्र गटात भारतीय संघाने १५व्या क्रमांकावर स्पर्धा पूर्ण केली.

दोहा येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ४ बाय ४०० मीटर स्पर्धेतील दोन्ही गटांमधील अव्वल १० संघांना पात्र होता आले. मिश्र गटात अव्वल १२ संघांना पात्रतेची संधी मिहाली.

महिलांच्या ४ बाद ४०० मीटर शर्यतीत हिमा दास, एम. आर. पूवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि व्ही. आर. विस्मया यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या टप्प्यात ३ मिनिटे, ३१.९३ सेकंदांची वेळ राखत चौथे स्थान मिळवले. परंतु एकंदरीत त्यांना १७वा क्रमांक मिळाला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या हिमाच्या समावेशाबाबत शंका निर्माण झाली होती. परंतु ती आत्मविश्वासाने सहभागी झाली आणि तिचा टप्पा ५२.६० सेकंदांत पूर्ण केली. या टप्प्यात ती संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर होती. तिने बॅटन पूवम्माकडे दिल्यानंतर भारताची कामगिरी घसरली आणि हा संघ सहाव्या स्थानावर फेकला गेला. मग पूवम्माने गायकवाडकडे बॅटन दिली. तिने संघाला सहाव्या स्थानावरच राखले. अखेरीस विस्मयाने भारताला पाचव्या क्रमांकापर्यंत पुढे नेले. परंतु युक्रेनचा संघ अपात्र ठरल्यामुळे भारताला शर्यतीत चौथे स्थान मिळाले. गेल्या महिन्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत हिमाशिवाय रुपेरी कामगिरी करताना भारताने ३ मिनिटे ३२.२१ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. त्याहून सरस कामगिरी या वेळी भारताने नोंदवली.

पुरुषांच्या ४ बाय ४०० रिलेमध्ये कुन्हू मोहम्मद, जिथू बेबी, जीवन सुरेश आणि मोहम्मद अनिशचा समावेश असलेल्या चमूनला ३ मिनिटे, ०६.०५ सेकंद अशी वेळ राखता आली. अरोकिया राजीवला संघात स्थान मिळवता आले नाही.

४ बाद ४०० मिश्र गटात जितू बेबी, सोनिया वैश्य, प्राची आणि अँटनी अ‍ॅलेक्स यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला शर्यतीत पाचवे आणि एकूण १५वे स्थान मिळाले. त्यांनी ३ मिनिटे, २३.५९ सेकंद अशी वेळ राखली.