महिलांमध्ये लॅग्नोला आणि पुरुषांमध्ये कार्लसनला विश्वविजेतेपद

अखेरच्या तीन डावांत पराभव पत्करल्यामुळे जलद (रॅपिड) प्रकारातील विश्वविजेतेपदानंतर अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारातील जगज्जेतेपद पटकावण्यात भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला अपयश आले. दोन दिवसांच्या जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीला १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अतिजलद प्रकारात महिलांमध्ये रशियाच्या कॅटरिना लॅग्नोने आणि पुरुषांमध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने विश्वविजेतेपदावर नाव कोरले. शनिवारी चीनच्या लेई टिंगजीला आर्मागेडॉन डावात पराभूत करून हम्पीने जागतिक महिला जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर अतिजलद प्रकारात पहिल्या दिवशी हम्पीने दिमाखदार कामगिरी करीत नऊपैकी सात गुण मिळवून दुसरे स्थान राखले होते; परंतु दुसऱ्या दिवशी हे सातत्य तिला राखता आले नाही. १७ डावांपैकी तिच्या खात्यावर १०.५ गुण जमा होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या द्रोणावल्ली हरिकाला २५वे स्थान मिळाले.

हम्पीने दुसऱ्या दिवशी शानदार प्रारंभ करताना पहिले दोन डाव जिंकले. मग १३व्या डावानंतर दोन अनिर्णीत लढतींसह तिने लॅग्नोसह संयुक्त आघाडी घेतली होती. दोघींच्या खात्यावर प्रत्येकी १० गुण जमा होते. मग १४व्या डावात रशियाच्या अ‍ॅलिसा गॅलियामोव्हाविरुद्ध तिने बरोबरी साधली. त्यामुळे हम्पी लॅग्नोपासून अर्ध्या  गुणाच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर फेकली गेली. मग १५, १६ आणि १७वे डाव गमावल्यामुळे हम्पीला सलग दुसरे विश्वविजेतेपद जिंकण्यात अपयश आले. ३२ वर्षीय हम्पीने २०१६ ते २०१८ या कालावधीत मातृत्वासाठी विश्रांती घेतली होती.

लॅग्नोने पहिल्याच दिवशी नऊ डावांपैकी आठ गुण मिळवून एकटीने आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवशीसुद्धा तीच लय राखत १७ पैकी १३ गुण मिळवून विश्वविजेतेपद राखले. युक्रेनच्या अ‍ॅना म्युझीच्यूकला (१२.५ गुण) उपविजेतेपद मिळाले.