कुस्तीकडून मिश्र मार्शल आर्ट्सकडे वळलेल्या रितू फोगटला केंद्र सरकारच्या ऑलिम्पिक व्यासपीठाचे लक्ष्य योजनेतून (टॉप्स) वगळण्यात आले आहे.

२०२०च्या टोक्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी अनुपलब्ध असल्याचे स्पष्ट करून सिंगापूरमध्ये मिश्र मार्शल आर्ट्समध्ये नशीब अजमावणाऱ्या रितूला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) ‘टॉप्स’ योजनेतून वगळले आहे.

‘‘२०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत रितू भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही. याचप्रमाणे ती सध्या मिश्र मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे तिचे नाव या योजनेतून काढण्यात आले आहे,’’ असे ‘साइ’ने म्हटले आहे.

रितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. फोगट भगिनींपैकी गीता आणि बबिता यांच्यानंतर रितू ही कुस्तीमध्ये नाव कमावणारी तिसरी बहीण आहे.

या बैठकीला ‘साइ’चे महासंचालक नीलम कपूर आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा उपस्थिती होते. या वेळी टोक्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने पाच पॅराबॅडमिंटनपटूंचा ‘टॉप्स’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.