प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. प्रत्येक वर्षी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पद्म-पुरस्काराने गौरव करण्यात येतो. २०२० साली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत बॉक्सर मेरी कोमला पद्मविभूषण तर बॅडमिंनटपटू पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

मात्र या यादीमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हीचं नाव नसल्यामुळे तिने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी असतात. मात्र असं जाणवतंय की हे पुरस्कार तुमच्या सध्याच्या कामगिरीवर दिले जात नाहीत. प्रत्येकवेळी योग्य व्यक्तींना डावललं जातं. हा एक पॅटर्नच बनलाय आणि २०२० ची यादीही याला अपवाद नाहीये. पुरस्कार कोणाला मिळणार हे नेमकं ठरवतं तरी कोण??” या शब्दांमध्ये विनेशने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षभरात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला विनेशने धडाकेबाज कामगिरी केली आहे. दरम्यान, मेरी कोमव्यतिरीक्त क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, माजी हॉकीपटू एम.पी.गणेश, नेमबाजपटू जितू राय, भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार ओनिअम बेंबम देवी, तिरंदाज तरुणदीप राय यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.