भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आगामी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलदरम्यान साहाच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, ही दुखापत अजुनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं कळतं आहे. याच कारणासाठी साहाला अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. १ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते आहे.

“साहाला झालेल्या दुखापतीनंतर त्यावर योग्य उपचार सुरु आहेत. मात्र अजुनही ती दुखापत म्हणावी तशी बरी झालेली नाहीये. त्याच्या अंगठ्याला अजुनही प्लास्टर आहे, अशाही परिस्थितीत तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊन सराव करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याला जागा मिळणं कठीण वाटत आहे.” बीसीसीआयमधील सुत्रांनी CricketNext या वेबसाईटला माहिती दिली आहे.

सध्या दिनेश कार्तिकसह काही महत्वाचे खेळाडू भारत अ संघाकडून इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे साहाची दुखापत बरी न झाल्यास दिनेश कार्तिकला भारताच्या कसोटी संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध औपचारिक कसोटी सामन्यामधूनही साहाने माघार घेतली आहे. बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाहीये. मात्र साहाच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक किंवा पार्थिव पटेल यांच्या नावाचा संघात विचार केला जाऊ शकतो.