भारताप्रमाणेच अमेरिका देखील करोना विषाणूमुळे त्रस्त आहे. अमेरिकेत १०० पेक्षा अधिक लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. करोना विषाणूचा प्रसार आणखी होऊ नये म्हणून अमेरिकन सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी ज्या ठिकाणी गर्दी जमेल असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयाचा मोठा फटका WWE ला देखील बसला आहे.

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट अर्थात WWE हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय फाईटिंग शो म्हणून ओळखला जातो. WWE चे दर आठवड्याला दोन भाग प्रदर्शित होतात. ही फाईटिंग स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक स्टेडिअममध्ये हजेरी लावतात. मात्र करोना विषाणूचे संकट टळेपर्यंत प्रेक्षकांना WWE चे सामने स्टेडिअममध्ये जाऊन पाहता येणार नाही. परिणामी WWE रेसलर्सला रिकाम्या खुर्च्यांसमोर रेसलिंग करावी लागत आहे.

WWEचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्स मॅकमोहन यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “WWE हा रिअलिटी शो नाही. ही एक खरीखुरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत फायटर्स जिवाचं रान करुन लढतात. मात्र त्यांना आता प्रेक्षकांशिवाय खेळावं लागणार आहे. प्रेक्षकांशिवाय कुठल्याही खेळाडूच्या मनात उत्साह संचारत नाही. प्रेक्षकांशिवाय तो आपला सर्वोत्कृष्ट खेळ सादर करु शकत नाही. अशीच काहीशी अवस्था सध्या WWE फायटर्सची आहे. मात्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. WWE चाहत्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सरकारसोबत आहोत.”