ऋषिकेश बामणे

यशस्वी जैस्वालने युवा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबरोबरच संपूर्ण स्पर्धेत सातत्याने अप्रतिम खेळ केल्याचा मला आनंद आहे. परंतु त्याच्या कामगिरीबाबत मी समाधानी नक्कीच नाही, अशी प्रतिक्रिया यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी व्यक्त केली.

१८ वर्षीय डावखुरा सलामीवीर यशस्वीने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षांखालील) तब्बल चार अर्धशतके आणि एका शतकासह सर्वाधिक ४०० धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या अंतिम लढतीत तो दुर्दैवाने ८८ धावांवर बाद झाला. त्यामुळे ज्वाला यांनाही आपली निराशा लपवता आली नाही.

‘‘संपूर्ण स्पर्धेतील सातत्यपूर्ण खेळासाठी यशस्वीचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. परंतु अंतिम सामन्यातसुद्धा थोडासा संयम बाळगून त्याला शतक साकारता आले असते. त्याच्या शतकामुळे भारतालाही मोठी धावसंख्या उभारता आली असती. त्यामुळेच प्रशिक्षक म्हणून यशस्वीच्या कामगिरीचा मला आनंद वाटत असला तरी मी समाधानी नक्कीच नाही,’’ असे ज्वाला म्हणाले.

यशस्वीच्या एकंदर संघर्षपूर्ण प्रवासाविषयी तुमचे काय मत आहे, असे विचारले असता ज्वाला म्हणाले, ‘‘माझ्याशी भेट होण्यापूर्वी यशस्वीचा संघर्ष सुरू होता. आम्ही दोघे एकत्र आल्यापासून फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यशस्वीमध्ये अफाट गुणवत्ता असून मी फक्त त्याला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करत आहे. त्याच्या उदयाची ही सुरुवात असून अद्याप त्याला बराच पल्ला गाठायचा आहे.’’

आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) यशस्वी राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यासंबंधी यशस्वीला काही मार्गदर्शन केले का, असे विचारले असता दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतरच आम्ही ‘आयपीएल’च्या तयारीला लागू, असे ज्वाला यांनी सांगितले.

‘‘पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर काही दिवसांसाठी मी दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. त्यावेळी यशस्वीची भेट घेऊन मी त्याला अंतिम सामन्याचे अतिरिक्त दडपण न घेता बिनधास्त खेळण्याचे सुचवले. ‘आयपीएल’सारख्या मोठय़ा स्पर्धेचा विचार मनाच्या कोपऱ्यात घोळत असला, तरी त्याविषयी आम्ही सध्या काहीही चर्चा केली नसून यशस्वी भारतात परतल्यानंतरच आम्ही ‘आयपीएल’च्या तयारीला लागू,’’ असे ज्वाला यांनी नमूद केले.