भारताचा डेव्हिस चषक टेनिसपटू युकी भांब्रीने तैपेई एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. बिगरमानांकित युकीने आठव्या मानांकित स्थानिक खेळाडू जिमी वांगवर ६-३, ६-१ अशी मात केली.
अडखळत सुरुवातीनंतर युकीने अवघ्या तासाभरात सामना जिंकला. पहिल्या सेटमध्ये त्याने तीन ब्रेकपॉइंट वाचवले. जागतिक क्रमवारीत २१६व्या स्थानी असलेल्या युकीला दुसऱ्या सेटमध्ये एकही ब्रेकपॉइंट मिळाला नाही.
‘‘आजचा सामना खडतर होता. जिमीने शानदार खेळ करीत सातत्याने माझ्यावर दडपण ठेवले,’’ असे युकीने सांगितले. पुढच्या सामन्यात युकीचा मुकाबला गो सोइडाशी होणार आहे. दुहेरी प्रकारातही युकीने उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. साकेत मायनेनीच्या साथीने खेळताना विजय मिळवला. आता या जोडीची लढत सन्चाई आणि स्नोनचॅट रतिवाताना जोडीशी होणार आहे.