29 October 2020

News Flash

१० वर्षांचा असताना क्रिकेट नव्हे तर या खेळात युवीला मिळाले होते सुवर्णपदक

शाळेत असताना युवी सकाळी क्रिकेटच्या मैदानात जायचा आणि रात्री घरी परतायचा. 

संग्रहित छायाचित्र

भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंगने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. २००० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार अर्धशतक ठोकून भारतीय संघातील स्थान पक्के करणाऱ्या युवराज सिंगचा हा प्रवास संघर्षमय होता. क्रिकेट खेळत असताना युवराज सिंगला कर्करोगाने ग्रासले, यातून न खचता युवराजने रोगावर मात केली आणि पुन्हा एकदा मैदानात परतला. युवराज सिंग लहानपणी क्रिकेटकडे कसा वळला, याचा किस्सा देखील मजेशीर आहे. १० वर्षांचा असताना युवराजने स्केटिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. त्याक्षणी युवराजचे वडील योगराज यांनी त्याला स्केटिंगऐवजी क्रिकेटकडे लक्ष द्यायला सांगितले आणि भारतीय संघाला ‘युवराज’ गवसला.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे देखील माजी क्रिकेटपटू आहेत. योगराज सिंग यांनी एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मुलाने देखील क्रिकेट खेळावे, अशी त्यांची इच्छा होती. योगराज हे कडक शिस्तीचे होते. दहा वर्षांचा असताना युवराजने शालेय स्पर्धांमध्ये स्केटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यावेळी योगराज सिंग यांना मुलाला खेळात जास्त रस असल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाच्या गळ्यातील सुवर्ण पदक काढले आणि यापुढे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे, असे सांगितले. इथून सुरु झाला युवराज सिंगचा क्रिकेटमधील प्रवास. शाळेत असताना युवी सकाळी क्रिकेटच्या मैदानात सरावासाठी जायचा आणि रात्री घरी परतायचा.

युवराज सिंगला नैरोबीत रंगलेल्या आयसीसीच्या स्पर्धेत भारताच्या वन डे संघात स्थान मिळाले. केनियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात युवीला फलंदाजींची संधीच मिळाली नाही. मात्र, यानंतर चार दिवसांनी युवीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल दव्रिड, विनोद कांबळी हे स्वस्तात माघारी परतले होते. युवी पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला होता. त्याने ८० चेंडूत १२ चौकार मारुन ८४ धावा केल्या होत्या. युवीची ही खेळी सर्वोत्तम खेळीपैकी एक मानली जाते. युवीच्या या खेळीच्या आधारे भारताने ऑस्ट्रेलियावर २० धावांनी मात केली आणि या खेळीसाठी युवराज सामनावीर ठरला. यानंतर युवी भारताच्या मधल्या फळीतील शिलेदार ठरला.

सोमवारी निवृत्ती स्वीकारल्यानंतर युवीने वडिलांचे यासाठी आभार मानले. माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला, मला मार्गदर्शन केले. १९८३ मधील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याची खंत त्यांना वाटायची. पण २०११ मधील विश्वविजेत्या भारतीय संघात माझा समावेश होता, याचा त्यांना आनंद होता. माझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीविषयी ते समाधानी आहेत, अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:33 pm

Web Title: yuvraj singh journey father yograj role got gold medal in skating at age of 10 vcp 88
Next Stories
1 निवृत्तीच्या वेळी काय म्हणाला युवराज ऋषभ पंतबद्दल?
2 सचिन तेंडुलकर माझा आयडॉल-युवराज
3 आयपीएलमध्ये शेवटी खेळायला मिळालं असतं तर… युवराजची खंत
Just Now!
X