करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. देशभरात सध्या करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता हा लॉकडाउन आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. भारतीय संघाचे क्रिकेटपटूही या काळात घरातच आहेत. मात्र भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आता लॉकडाऊनला कंटाळला आहे. एकदा लॉकडाउन संपल्यानंतर आपण किमान ३ वर्ष तरी घरात राहणार नसल्याचं चहलने स्पष्ट केलंय.

अवश्य वाचा – Video : व्यायाम, वाचन, मुलीशी गप्पा आणि बायकोला मदत, मराठमोळा अजिंक्य घरात रमला

“एकदा लॉकडाउन संपलं की मी घरी परतणार नाही. आता मला हे सहन होत नाहीये, मी आता अधिक काळ घरात राहू शकत नाही. सध्या जितका वेळ मी घरात राहतो आहे पुढच्या ३ वर्षात मी घराबाहेर राहून सगळं भरुन काढणार आहे. मी जवळच्या हॉटेलमध्ये रहायला जाईन पण घरात राहणार नाही. बस्स झालं आता मला लॉकडाउन झेपत नाही”, चहल एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. लॉकडाउनच्या काळात चहल सोशल मीडिया आणि टिकटॉक व्हिडीओतून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो आहे.

मला सारखं मैदानावर जावसं वाटतंय, मला गोलंदाजीचा सराव करायचा आहे. सध्या क्रिकेट खेळायला खूप संधी आहे आणि नेमक्या याच वेळेत तुम्हाला घरी बसून रहावं लागतय. मी आता जो काही आहे ते क्रिकेटमुळेच…त्यामुळे ज्या दिवशी लॉकडाउन संपेल त्यादिवशी मी घराबाहेर जाऊन सरावाला सुरुवात करणार आहे, चहल आपल्या लॉकडाउनच्या अनुभवाबद्दल सांगत होता. दरम्यान २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएलही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे, मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता आयपीएल होण्याची शक्यता कमीच आहे.