मुंबई मॅरेथॉनमध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या संस्थेसाठी किंवा स्वत:साठी धावत असतो. पण आपले संपूर्ण शरीरच लोकांच्या सेवेसाठी अर्पण केलेले १०० वर्षांचे फौजा सिंग हे निधी उभारण्यासाठी मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. त्यासाठी फौजा सिंग हे लंडनहून मुंबईत दाखल झाले आहेत.
पत्नी आणि मुलाच्या अपघाती निधनानंतर लंडनमध्ये १९९२ साली स्थायिक झालेल्या फौजा सिंग यांनी आपले उर्वरित आयुष्य गरजू लोकांसाठी आणि संस्थांसाठी वाहण्याचे ठरवले आहे. अनेक मॅरेथॉन शर्यतींमध्ये सहभागी होण्यासाठी फौजा सिंग यांना निमंत्रणे येतात. त्यातून मिळालेला एकही पैसा ते आपल्याकडे ठेवत नाहीत. सर्व रक्कम ते कर्करोग आणि हृदयरोगावर काम करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द करतात. फौजा सिंग यांनी न्यू यॉर्क आणि लंडन मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली आहे. ‘‘मी पूर्ण शरीरच निधी उभारण्यासाठी समर्पित केले आहे. शरीर साथ देईपर्यंत मी यापुढेही धावत राहणार आहे. त्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करण्याची माझी तयारी आहे,’’ असे फौजा सिंग आत्मविश्वासाने सांगतात.
जालंधर येथील फौजा सिंग यांनी वयाच्या ८८व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला २१ कि.मी. धावणाऱ्या फौजा सिंग यांनी नंतर पूर्ण मॅरेथॉनमध्येही भाग घेतला. फौजा सिंग हे मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या (४.७ कि.मी) शर्यतीत धावणार आहेत.
रामसिंगची मुंबई मॅरेथॉनमधून माघार
मुंबई : गेल्या वर्षीचा भारतीय गटातील विजेता आणि मुंबई मॅरेथॉन शर्यतीद्वारे लंडन ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करणारा सेनादलाचा धावपटू रामसिंग यादव याने २० जानेवारीला होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीतून माघार घेतली आहे. रामसिंगने ई-मेलद्वारे आपला निर्णय संयोजकांना कळवला आहे. याविषयी रामसिंगचे प्रशिक्षक के. सी. मॅथ्यूज म्हणाले, ‘‘रामसिंगने नोव्हेंबर महिन्यापासूनच मुंबई मॅरेथॉनसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. पण काही दिवसांपूर्वी झालेल्या सैन्यदिनानिमित्त त्याला १० दिवसांसाठी बोलावणे आले. त्यामुळे त्याने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी न होण्याचे ठरवले.