Divya Deshmukh Enters In Final Of FIDE Women’s World Cup: भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहासाला गवसणी घातली आहे. दिव्याने एफआयडीई विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात तान झोंग्यीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. तिने हा सामना १.५-०.५ च्या फरकाने आपल्या नावावर केला. यासह दिव्या देशमुख ही या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या सामन्यात पांढऱ्या सोंगट्यांसह खेळणाऱ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने दमदार कामगिरी केली. यासह तिने २०२६ मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात काळ्या सोंगट्यांसह खेळताना पहिला गेम ड्रॉ राहिला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये खेळताना दिव्याने दमदार खेळ केला. पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना तिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर सातत्याने दबाव बनवून ठेवला. तिने झ्योंगीला चूका करायला भाग पाडलं. यासह हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. हा विजय भारतासाठी देखील अतिशय खास ठरला आहे. कारण याआधी कुठल्याही भरतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. अंतिम फेरीत प्रवेश करताच दिव्या देशमुखला अश्रू अनावर झाले.
तर दुसरीकडे कोनेरु हम्पीचा दुसऱ्या उपांत्यफेरीचा सामना चीनच्या लेई टिंगजीसोबत ड्रॉ राहिला. त्यामुळे तिला टाय ब्रेकर खेळावा लागणार आहे. या सामन्यात कोनेरु हम्पी पांढऱ्या सोंगट्यांसह खेळत होती. मात्र, तिला लेईला बचाव भेदून काढता आलेला नाही. त्यामुळे आता हे दोन्ही खेळाडू गुरूवारी होणाऱ्या रॅपिड आणि ब्लिट्ज टाय- ब्रेकर सामन्यात भिडणार आहेत. या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडू अंतिम फेरीत दिव्या देशमुखचा सामना करणार आहे.
दिव्या देशमुखची दमदार कामगिरी
या स्पर्धेतील उपांत्यफेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी प्रवेश केला होता. एकाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर दुसरीकडे हम्पीला देखील अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे दोन्ही भारतीय खेळाडू या स्पर्धेतील जेतेपदासाठी आमनेसामने येऊ शकतात. या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दिव्याने आतापर्यंत जगभरातील स्टार खेळाडूंना पराभूत केलं आहे.