ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राने नवी दिल्लीत सुरू झालेल्या आशियाई एअरगन नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्र येथे आयोजित स्पर्धेत, १० मीटर एअर रायफल प्रकारात खेळताना अभिनवने २०८.८ गुणांसह अव्वल स्थानी कब्जा केला. अभिनवने याआधीच पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठी उत्तम सराव आहे असे अभिनवने म्हटले होते. सुवर्णपदकासह ऑलिम्पिक तयारी जोशात सुरु असल्याचे अभिनवने सिद्ध केले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या गगन नारंगला चौथ्या तर चैन सिंगला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. पाच वर्षांच्या कालावधीनंतर भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेचे आयोजन होते आहे.