• लालचंद राजपूत, अफगाणिस्तान क्रिकेट संघ प्रशिक्षक

भारतीय संघाबरोबर रणजी आणि आयपीएलमध्येही भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी प्रशिक्षकाची भूमिका वठवली. आता अफगाणिस्तानसारख्या क्रिकेट विकसनशील देशाचे प्रशिक्षकपद ते भूषवीत आहेत. त्यांनी हे पद सांभाळल्यापासून संघाने वर्षभरात जवळपास सर्वच मालिका जिंकल्या आहेत. आता या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्याचे लक्ष्य राजपूत यांनी डोळ्यापुढे ठेवले आहे. या संघाविषयी, खेळाडू आणि भविष्याविषयी राजपूत यांनी खास मुलाखतीमध्ये संवाद साधला.

तुम्हाला हे प्रशिक्षकपद कसे मिळाले?

बऱ्याच कालावधीपासून अफगाणिस्तानचे क्रिकेट मंडळ माझ्याशी यासंदर्भात संवाद साधत होते, पण मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यामुळे मी त्यांना थोडा वेळ थांबण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडे हर्षेल गिब्स, मोहम्मद कैफ, कॉली कॉलीमोर यांच्यासारख्या दहा माजी क्रिकेटपटूंचे प्रशिक्षकपदासाठी अर्ज आले होते, तरीही ते माझ्यासाठी थांबले. भारताच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांची निवड झाल्याचे वृत्त आले आणि त्यांनी मला दूरध्वनीवरून पुन्हा एकदा प्रशिक्षपदासाठी गळ घातली. त्या वेळी मी काबूलला येणार नाही, अशी अट त्यांना घातली होती. त्यांनी या अटीचा स्वीकार केला आणि मला प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मिळाली.

अफगाणिस्तानातली परिस्थिती भयावह असते, त्याचा परिणाम त्यांच्या खेळाडूंवर पाहायला मिळाला का?

नाही. अफगाणिस्तान म्हटले की आपल्याला गोळीबार, हल्ले, रक्तपात हे सारे डोळ्यापुढे येते. मी जेव्हा घरी या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यासाठी सल्ला विचारला तेव्हा त्यांच्याही मनात काहीशी अशीच भावना होती, पण मला त्यांना नोइडा येथे प्रशिक्षण द्यायचे असल्याने साऱ्या शंकांना पूर्णविराम मिळाला. आपण जसा या देशाबद्दल विचार करतो, तसे या संघातील खेळाडू नक्कीच नाहीत. ते भारतात मुरलेले वाटतात. बॉलीवूडचे सिनेमे पाहतात. सुरेख हिंदी बोलतात. त्यामुळे त्यांची संस्कृती मला वेगळी वाटत नाही.

तुम्ही प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर संघात कोणते बदल केले?

या खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आहे. फक्त त्यांनी मानसिकरीत्या कणखर बनवण्याचा मी प्रयत्न केला. या खेळाडूंना मोठे फटके मारण्याची फार आवड आहे, पण सामना फक्त मोठय़ा फटक्यांच्या जिवावर जिंकता येत नाही. गेल्या वर्षभरात आम्ही हॉलंड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, आर्यलड, संयुक्त अरब अमिराती या संघांना पराभूत केले. फक्त बांगलादेशविरुद्ध आम्ही २-१ असे पराभूत झालो. या मालिकेतील निर्णायक सामना आम्ही फक्त सात धावांनी गमावला. हा सामना पण आमच्या हातात होता, पण शकीब अल हसनला मोठे फटके मारण्याच्या नादात आम्ही तो गमावला. त्यानंतर मी त्यांची मानसिकता बदलली. आता हे खेळाडू मोठी खेळी खेळण्यावर भर देत आहेत आणि हेच त्यांच्यासाठी चांगले असेल.

अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळाली, याबद्दल काय वाटते?

ही या दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर अन्य खेळाडूूंसाठी ही ग\ोष्ट प्रेरणादायी आहे. आयपीएलमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी त्यांचा संवाद होईल आणि बऱ्याच गोष्टी त्यांना कमी कालावधीमध्ये शिकता येतील. त्यामुळे या संधीचा त्यांना भविष्यात चांगलाच फायदा होणार आहे.

आता भविष्यात तुमचे लक्ष्य काय असेल?

आतापर्यंत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे भविष्यात संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्याचे माझे लक्ष्य आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आयसीसी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल, अशी मला आशा आहे.