Hardik Pandya recovers from injury joins Reliance One team : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयपीएल २०२२४ च्या आधी तब्बल ४ महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. तो डीवाय पाटील टी-२० चषक स्पर्धेत रिलायन्स वन टीमची धुरा सांभाळत आहे. हार्दिकच्या मैदानात परतल्याने चाहत्यांचे चेहरे फुलले आहेत. वास्तविक, हार्दिक पंड्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर हार्दिक या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. दरम्यान, आयपीएल २०२४ पूर्वी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता आयपीएल २०२४ पूर्वी तंदुरुस्त झाल्यानंतर हार्दिक मैदानात परतला आहे.

हार्दिक पंड्याच्या खांद्यावर रिलायन्स वन टीमची धुरा –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिक पांड्या आता डीवाय पाटील टी-२० चषक स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. हार्दिक डी वाय पाटील टी-२० कपमध्ये रिलायन्स वन संघाचे नेतृत्व करत आहे. गेल्या आठवड्यात हार्दिकने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर हार्दिकने डीवाय पाटील टी-२० चषकासह आयपीएल २०२४ ची तयारी सुरू केली आहे.

हार्दिक सोबत, रिलायन्स वन संघात तिलक वर्मा, नेहल वढेरा, आकाश मधवाल आणि पियुष चावला सारखे खेळाडू देखील आहेत, जे आयपीएल २०२४ च्या आगामी हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळतील. हार्दिक या सामन्यात गोलंदाजी करताना देखील दिसला, याचा अर्थ अष्टपैलू खेळाडू आयपीएल आणि आगामी टी-२० विश्वचषक २०२४ साठी स्वतःला तयार करत आहे. याशिवाय संघाबाहेर असलेला इशान किशनही डीवाय पाटील टी-२० चषकात क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : यशस्वी जैस्वालचा ‘विराट’ विक्रम! किंग कोहलीच्या ‘या’ पराक्रमाशी साधली बरोबरी

हार्दिक मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार –

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी, हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये घेतले. त्यानंतर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याला संघाचा नवा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा झाली. यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सवर बरीच टीका झाली होती. पण आता आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स त्यांचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.