मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. सध्या जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सचिनने यंदा वाढदिव स साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातलाय ताईत बनलेल्या सचिनवर आजही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या सचिन तेंडुलकरसोबत पहिल्या भेटीच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

“मी १४ वर्षांचा होतो आणि त्यावेळी मी माझ्या प्रशिक्षकांना विनंती केली होती की मला सचिनला भेटायचं आहे. माझ्या सरांनी सचिन सरांची परवानगी घेतली आणि ते हो म्हणाले. त्यांनी मला संध्याकाळी साडेचार वाजता घरी यायला सांगितलं होतं. पण त्यावेळी मला इतका आनंद झाला होता की मी उत्साहाच्या भरात सकाळी साडेनऊ वाजता सचिनच्या घराखाली येऊन पोहचलो होतो. खरंतर त्यावेळी मी प्रचंड नर्व्हस होतो. मी त्यावेळी डोंबिवलीला राहत होतो आणि माझे प्रशिक्षक दादरला राहत होते. मी सकाळी त्यांच्या घरी जाऊन पोहचलो, मला पाहून सर म्हणाले, इतक्या लवकर का आला आहेस?? मी म्हणालो गाडी लेट झाली, किंवा रद्द झाली तर मला सचिन सरांना भेटायची संधी गमवायची नाहीये. त्यादिवशी नेमकं काय केलं हे मला नेमकं आठवत नाही, पण मी दादर स्टेशनच्या बाहेर खूप फिरलो, आज मी सचिन तेंडुलकरला भेटणार आहे याचा मला प्रचंड आनंद होत होता. ज्यावेळी मी पहिल्यांदा सचिनला भेटलो त्यावेळी मी त्याची ऑटोग्राफ घेतली, आम्ही क्रिकेटबद्दल गप्पा मारल्या.” सचिनच्या वाढदिवसानिमीत्त एका विशेष व्हिडीओत अजिंक्यने या आठवणी सांगितल्या आहेत.

यानंतर काही वर्षांनी अजिंक्यने सर्वांना आपल्या फलंदाजीची दखल घ्यायला भाग पाडलं. मुंबई रणजी संघ ते आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघापर्यंत अजिंक्यने सचिन तेंडुलकरसोबत ड्रेसिंग रुम शेअर केली. या गोष्टीचा आपल्याला प्रचंड अभिमान असल्याचंही अजिंक्य म्हणाला. दरम्यान सध्याच्या खडतर काळात सचिन आपलं सामाजिक भान राखून आहे. करोनाविरुद्ध लढ्यात सचिनने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत केली आहे. याचसोबत अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांसोबत सचिन स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यामध्ये अग्रेसर आहे.