भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपली असली तरी त्यादरम्यानच्या वादांवर आणि चर्चेत आलेल्या घटनांवर अजूनही चर्चा सुरूच आहे. आकाशदीपने बेन डकेटला बाद केल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला सेंड ऑफ दिल्याने बरीच चर्चा झाली. फक्त खांद्यावर हातच नाही ठेवला तर डकेटशी आकाशदीप काहीतरी बोलत देखील होता. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं ते आता एका आठवड्यानंतर आकाशदीपने सांगितलं आहे.
ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी आकाशदीपने बेन डकेटला झेलबाद करवत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यानंतर आकाशदीपने विकेटचा आनंद साजरा केल्यानंतर डकेटच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसला. पण डकेटने त्याला काही उत्तर दिलं नाही आणि तो शांत राहिला.
आकाशदीपच्या या कृतीमुळे त्याच्यावर टीकादेखील केली गेली. बेन डकेटच्या बालपणीच्या कोचने तर आयसीसीने खेळाडूंच्या अशा वागण्याबाबत त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे असं म्हटलं. पण या दोघांमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं होतं, हे आकाशदीपने सांगितलं.
आकाशदीप आणि डकेट यांच्यात सामन्यादरम्यान बोलणं सुरू होतं. आकाशदीप मैदानावर घडलेला प्रसंग सांगताना म्हणाला, “मी बेन डकेटला बरेचदा बाद केलं आहे आणि त्याच्याविरूद्ध माझा रेकॉर्डही चांगला राहिला आहे. मी डावखुऱ्या फलंदाजांविरूद्ध गोलंदाजी करताना विकेट मिळण्याच्या संधी जास्त आहेत, असं मला वाटतं. पण त्यादिवशी तो माझी लाईन-लेंग्थ बिघडवण्याचा प्रयत्न करत होता आणि वेगळे फटकेही खेळत होता. यानंतर तो येऊन म्हणाला, आज त्याचा दिवस आहे आणि मी त्याला बाद करू शकणार नाही.”
पुढे आकाशदीप म्हणाला, “एखादा फलंदाज खेळपट्टीवर असे फटके खेळत असेल, तर गोलंदाजाच्या लाईन-लेंग्थवर परिणाम होतो, कारण तो पुढे काय करणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. नेमकं हेच मैदानात घडत होतं. त्यात इंग्लंडची सुरूवात पण वेगवान झाली होती आणि आम्हाला विकेटची गरज होती.”
मी जेव्हा त्याला (डकेटला) बाद केलं तेव्हा मी त्याला म्हणालो, “मी जेव्हा त्याला (डकेटला) बाद केलं तेव्हा म्हणालो, तुझा फटका चुकला, मला विकेट मिळाली. दरवेळी तूच जिंकणार असं होत नाही. यावेळेस मी जिंकलो. षटकादरम्यान तो माझ्याशी बोलत होता. मीही उत्तर दिलं पण आमचं बोलणं खेळभावनेला साजेसं होतं”, असं आकाशदीप पुढे म्हणाला.