ऑल इंग्लंड स्पर्धा ही बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते आणि या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्नच असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढती स्पर्धा लक्षात घेता, हे विजेतेपद मिळविणे भारतीय खेळाडूंसाठी दिवास्वप्नच राहणार आहे, असे मत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी व्यक्त केले आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेली कांस्यपदक विजेती ऑलिम्पिकपटू सायना नेहवाल हिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले, तर परुपल्ली कश्यप यानेही निराशा केली. या खेळाडूंच्या कामगिरीविषयी व एकूणच भारतीय बॅडमिंटन क्षेत्राविषयी नाटेकर यांच्याशी केलेली ही बातचीत-
सायनाला या स्पर्धेत विजेतेपद मिळेल, अशी आशा होती. मात्र तिला उपांत्य लढतीतच पराभव स्वीकारावा लागला. त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल?
सायनाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले असले तरी तिच्या खेळातही काही मर्यादा आहेत. प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेल्या फटक्यांवर परतीचा फटका मारणे, कॉर्नरवर येणारे शटल याबाबत तिच्या कौशल्यात मर्यादा आहेत, हे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. सायना ही अतिशय मेहनती, जिद्दी खेळाडू आहे, याबाबत तीळमात्र शंका नाही. पूर्वी तिच्यापुढे फक्त चीनच्या खेळाडूंचेच आव्हान असे. आता परिस्थिती बदलत चालली आहे. चीनमधून नवनवीन खेळाडू येत आहेत. पण त्याचबरोबर थायलंड, दक्षिण कोरिया आदी देशांचे खेळाडूही अव्वल स्थानावर यश मिळवू लागले आहेत.
शारीरिक तंदुरुस्तीबाबत सायना कमी पडत आहे काय?
ऑलिम्पिक सुवर्णपदक तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविणे हे तिच्यासाठी आता कठीण झाले आहे. तिच्याकडे शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती असली तरी तिच्या तुलनेत परदेशी खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती खूपच वरचढ दर्जाची असते. सायनाला उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यापूर्वी प्रत्येक फेरीत झगडावे लागले होते. त्यामुळेच उपांत्य लढतीत तिच्यावर थोडेसे दडपण होते आणि या दडपणाखाली तिच्या खेळात नकळत चुका होत गेल्या. या चुकाच तिला महागात पडल्या.
सायनाच्या दर्जाइतके खेळाडू आपल्याकडे नाहीत. त्यामुळे तिच्या कामगिरीवर परिणाम होतो, असे वाटते का?
सायना ही महिला बॅडमिंटनमध्ये एकांडी शिलेदार आहे. गेली अनेक वर्षे ती एकाकी झुंज देत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पी. व्ही. सिंधू हिच्यासह भारताच्या काही खेळाडू चमकत असल्या तरी सायनाच्या क्षमतेइतक्या खेळाडू आपल्याकडे नाहीत. चीन, कोरिया व थायलंड आदी देशांमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्याची क्षमता असलेल्या अनेक खेळाडूंचा ताफा असतो. तशी स्थिती आपल्याकडे नाही.
कश्यप याच्याविषयी काय सांगाल?
कश्यपने ऑलिम्पिक स्पर्धेत अनपेक्षितरीत्या बरीच झेप घेतली असली तरी त्याच्या खेळातही खूप मर्यादा आहेत. तो मेहनती व चिकाटी वृत्तीचा खेळाडू आहे. तरीही शारीरिक क्षमतेबाबत त्याच्या खेळात अनेक वेळा मर्यादा दिसून आल्या आहेत.
प्रकाश पदुकोण व पुलेला गोपीचंद यांच्यानंतर एकाही भारतीय बॅडमिंटनपटूला या स्पर्धेत विजेतेपद मिळविता आलेले नाही, यामागचे कारण काय असू शकेल?
प्रकाश व गोपीचंद हे या खेळातील असामान्य खेळाडू आहेत. त्यांच्यावेळी सुविधा नसूनही त्यांनी अजिंक्यपद मिळविले. आता आपल्याकडे या खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली आहे. या खेळाची आंतरराष्ट्रीय दर्जाची संकुलेही आहेत. स्पर्धाचीही संख्या वाढली आहे. प्रकाश व गोपीचंद यांच्यासारख्या प्रशिक्षकांनी कितीही मेहनत घेतली तरी प्रत्यक्ष कोर्टवर त्यांचे शिष्य किती जीव ओतून कौशल्य दाखवितात, हे अधिक महत्त्वाचे आहे. सुविधा व सवलतींबाबत खेळाडूंना आता कसलीच चिंता नाही. पूर्वी आर्थिक समस्यांचा अडथळा, हा भारतीय खेळाडूंकरिता मोठे आव्हान असे. आता आर्थिक अडचणीचे कारण पुढे करता येणार नाही.
सुदैवाने या खेळाला प्रायोजकही मोठय़ा प्रमाणावर आहेत. देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रत्यक्ष सामन्यात उच्च दर्जाचा खेळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या तरी ऑल इंग्लंड, ऑलिम्पिक किंवा जागतिक अजिंक्यपद आदी स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविणे हे भारतीय खेळाडूंसाठी दिवास्वप्नच आहे.