युवराज सिंगच्या अष्टपैलू खेळाने त्याचे नेतृत्व खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले. याचप्रमाणे लेग-स्पिनर राहुल शर्माने पाच बळी घेत फिरकीची जादू दाखवली. त्यामुळेच भारतीय ‘अ’ संघाने एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर ९३ धावांनी दणदणीत विजय संपादन केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारत ‘अ’ संघाने ७ बाद २१४ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांनी पाहुण्यांचा डाव १६.३ षटकांत १२१ धावांत गुंडाळला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आंद्रे रसेलने चार चेंडूंत चार बळी घेत ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमधील विक्रमाची नोंद केली. परंतु वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे ही कामगिरी वाया गेली.
गोलंदाजीत दोन बळी घेणाऱ्या युवराजने ३५ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारताना ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याला साथ देणाऱ्या उन्मुक्त चंद (२९ चेंडूंत ४७ धावा) आणि केदार जाधव (२१ चेंडूंत ४२ धावा) यांनी प्रत्येकी ४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.
एकदिवसीय मालिकेमध्ये १-२ अशा फरकाने पराभव पत्करणाऱ्या भारतीय ‘अ’ संघाने ट्वेन्टी-२० सामन्यात दिलासादायी विजय मिळवला. राहुलने २३ धावांत ५ बळी घेत सर्वाचे लक्ष वेधले.

संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : २० षटकांत ७ बाद २१४ (रॉबिन उथप्पा ३५, उन्मुक्त चंद ४७, युवराज सिंग ५२, केदार जाधव ४२; आंद्रे रसेल ४/४५) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज ‘अ’ : १६.३ षटकांत सर्व बाद १२१ (आंद्रे फ्लेचर ३२, डेव्हॉन थॉमस २१; आर. विनय कुमार २/२२, राहुल शर्मा ५/२३, युवराज सिंग २/२४).