वॉशिंग्टन : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेणाऱ्या मातबर टेनिसपटूंच्या यादीत आता सेरेना विल्यम्सचाही समावेश झाला आहे. वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून सेरेनाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

पुढील महिन्यात वयाची चाळिशी गाठणाऱ्या सेरेनाने समाजमाध्यमांवर अमेरिकन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी, रॉजर फेडरर आणि राफेल नदालने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सेरेनाच्या खात्यावर २३ महिला एकेरी ग्रँडस्लॅमचा समावेश असून, मार्गारेट कोर्टचा २४ जेतेपदांचा विक्रम मोडण्यासाठी ती उत्सुक आहे. फेडरर, नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्या खात्यावर पुरुष एकेरीची२० ग्रँडस्लॅम जेतेपदे जमा आहेत.

भारताचे सुमित, अंकिता, रामकुमारचे आव्हान संपुष्टात

न्यूयॉर्क : सुमित नागल, रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना या भारतीय खेळाडूंना बुधवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेला ३० ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून आता फक्त प्रज्ञेश गुणेश्वरन या एकमेव भारतीय टेनिसपटूला एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. महिलांमध्ये अमेरिकेच्या जॅमी लोबने अंकिताला ६-३, २-६, ४-६ असे पराभूत केले. पुरुषांमध्ये अर्जेंटिनाच्या जुआन पाब्लो फिकोव्हिचने सुमितला ७-५, ४-६, ६-३ असे तीन सेटमध्ये नमवले. रशियाच्या डोनस्कोयने रामकुमारवर ४-६, ७-६, ६-४ अशी पिछाडीवरून सरशी साधली.