विजेतेपदाचा दावेदार असलेला अँडी मरे, जपानचा केई निशिकोरी व अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेलपोत्रो यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. महिलांमध्ये सिमोना हॅलेपने आव्हान राखले. पावसाच्या व्यत्ययामुळे स्पर्धेच्या काही सामन्यांचे वेळापत्रक कोलमडले.
मरेने स्पॅनिश खेळाडू मार्सेल ग्रॅनोलर्सचा ६-४, ६-१, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये धुव्वा उडविला. मरेने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच बिनतोड सव्र्हिसचाही बहारदार खेळ केला. पावसामुळे आर्थर अॅश स्टेडियमवरील या सामन्याचे वेळी आच्छादन घालण्यात आले होते.
निशिकोरीने अपराजित्व राखताना २० वर्षीय कॅरेन खाचानोवला ६-४, ४-६, ६-४, ६-३ असे पराभूत केले. कॅरेनने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविले होते. पावसामुळे या सामन्यात अनेक वेळा व्यत्यय आला होता. डेलपोत्रोने अमेरिकन खेळाडू स्टीव्ह जॉन्सनचे आव्हान ७-६ (७-५), ६-३, ६-२ असे संपुष्टात आणले.
पात्रता फेरीद्वारे मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या जेरॉड डोनाल्डसनने व्हिक्टर त्रिओकी या अनुभवी खेळाडूवर ७-५, ६-३, ६-३ असा अनपेक्षित विजय मिळविला. इंग्लंडच्या डॅनियल इव्हान्स याने जर्मनीच्या अॅलेक्झांडर जेव्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात आणले, त्याने हा सामना ६-४, ६-४, ५-७, ६-२ असा जिंकला.
महिलांच्या विभागात हॅलेपने ल्युसी साफारोवावर ६-३, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला. तिला हा सामना आच्छादने असताना खेळावा लागला. या अनुभवाबाबत ती म्हणाली, ‘माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता, मात्र त्यामुळे थंड वातावरणाचा थोडासा त्रास झाला.’
आच्छादनांमुळे प्रेक्षकांचा आवाज घुमत होता. त्याचा थोडासा त्रास मला झाला. मात्र हा सामना एकतर्फी जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला.
– अँडी मरे
महिलांच्या टेनिस प्रसारावर भर देणार – पिने
सिंगापूर : ‘आशियाई-पॅसिफिक देशांमध्ये क्रीडा क्षेत्राचा अधिकाधिक प्रसार होत असून महिलांच्या टेनिसचा विकास करण्यावर आम्ही भर देत आहोत,’ असे महिलांच्या टेनिस संघटनेच्या प्रादेशिक उपाध्यक्षा मेलिसा पिने यांनी सांगितले.
पिने म्हणाल्या, ‘स्पर्धेकरिता नवीन ठिकाणे निवडताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. संघटनेतर्फे दरवर्षी ५६ स्पर्धाचे आयोजन केले जाते. या स्पर्धासाठी ठिकाणे निवडताना पुरेशी कोर्ट्स, खेळाडूंची निवास व भोजन आदी व्यवस्था, प्रायोजक, प्रेक्षकांसाठी असलेली गॅलरी आदी विविध गोष्टींचा विचार करावा लागतो. आशिया-पॅसिफिक विभागात या खेळाचा प्रसार व्हावा म्हणूनच सिंगापूरमध्ये अंतिम फेरीचे सामने घेण्यात आले आहेत.’
अँडी मरे