मिलास राओनिकची दमदार वाटचाल; मरेची टॉमिकवर मात; कर्बर, अझारेन्काची आगेकूच
गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आगमनाची वर्दी देणाऱ्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला यंदाच्या वर्षांतील पहिल्या अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. उंचपुऱ्या आणि भेदक सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध मिलास राओनिकने वॉवरिन्कावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य लढतीत अँडी मरेने बरनॉर्ड टॉमिकला नमवले. महिलांमध्ये अँजेलिक्यू कर्बर आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी सहज विजय मिळवत आगेकूच केली.
तीन तास आणि ४४ मिनिटे चाललेल्या लढतीत राओनिकने पाच सेटच्या मुकाबल्यात वॉवरिन्कावर ६-४, ६-३, ५-७, ४-६, ६-३ असा विजय मिळवला. वॉवरिन्काविरुद्धच्या पाच लढतींमधला राओनिकचा हा पहिलाच विजय आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर गेइल मॉनफिल्सचे आव्हान असणार आहे. नव्या वर्षांत अपराजित राहण्याचा मान मिळवलेल्या राओनिकने ब्रिस्बेन स्पर्धेत रॉजर फेडररवर मात करत जेतेपद पटकावले होते. कालरेस मोया या नव्या प्रशिक्षकासह खेळणाऱ्या राओनिकने दोन सेट जिंकत आश्वासक सुरुवात केली. सरळ सेट्समध्ये वॉवरिन्काचे आव्हान संपुष्टात येणार असे चित्र होते. मात्र वॉवरिन्काने चिवटपणे खेळ करत पुढचे दोन सेट नावावर केले. पाचव्या आणि अंतिम सेटमध्ये वॉवरिन्काच्या खेळातली लय हरवली. राओनिकने याचा पुरेपूर फायदा उठवत बाजी मारली. अन्य लढतींमध्ये अँडी मरेने बरनॉर्ड टॉमिकवर ६-४, ६-४, ७-६ (७-४) अशी मात केली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची मरेची सातवी वेळ आहे. शेवटच्या लढतीत मरे खेळत असताना त्याचे सासरे कोसळले होते. सामन्यानंतर तात्काळ मरेने रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र मैदानाबाहेरील घटनांचा परिणाम होऊ न देता मरेने सातत्याने टॉमिकची सव्‍‌र्हिस भेदत बाजी मारली. स्पेनच्या डेव्हिड फेररने वेगवान सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध जॉन इस्नरवर ६-४, ६-४, ७-५ असा विजय मिळवला. गेइल मॉनफिल्सने आंद्रेय कुझनेत्सोव्हचा ७-५, ३-६, ६-३, ७-६ (७-४) असा पराभव केला. महिलांमध्ये अँजेलिक्यू कर्बरने अनिका बेकचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. व्हिक्टोरिया अझारेन्काने बार्बेरा स्टायकोव्हावर ६-२, ६-४ असा विजय मिळवला. जेरेमी कोन्टाने इकाटेरिना माकारोव्हावर ४-६, ६-४, ८-६ अशी मात केली. शुआई झांगने मॅडिसन की हिला ३-६, ६-३, ६-३ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

भारतीयांसाठी विजयी दिवस
अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने स्वेतलाना कुझनेत्सोव्हा आणि रॉबर्टा व्हिन्सी जोडीवर ६-१, ६-३ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या जोडीची पुढची लढत अ‍ॅना लेना ग्रोइनफेड आणि कोको व्हँडेवेघे या जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णाने युंग जान चानच्या साथीने खेळताना आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युकाझ कोबोट जोडीवर ४-६, ६-३ (१०-६) असा विजय मिळवला. कनिष्ठ गटात दहाव्या मानांकित प्रांजला याडापल्लीने मिरा अँटोनिश्च जोडीवर ७-६ (५), ६-३ अशी मात केली. करमान थांडीने पाना उर्वडीला ६-४, ६-२ असे नमवले. दुहेरी प्रकारात करमान-प्रांजला जोडीने पेट्रा हुले आणि सेलिना तुरुलिजा जोडीवर ६-४, ६-३ असा विजय मिळवला.