अर्जेटिनाचा जमैकाविरुद्धचा सामना लिओनेल मेस्सीचा शंभरावा सामना होता. मात्र बार्सिलोनासाठी अद्भुत प्रदर्शन करणाऱ्या मेस्सीला या महत्त्वाच्या लढतीत विशेष कामगिरी करता आली नाही. संपूर्ण कालावधीत चाचपडत खेळणाऱ्या अर्जेटिनाने जमैकावर १-० विजय मिळवत कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अन्य लढतीत उरुग्वे आणि पॅराग्वे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. बाद फेरीसाठी उरुग्वेला बरोबरी पुरेशी असल्याने त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग सुकर झाला.
गोन्झालो हिग्युेनच्या ११व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर अर्जेटिनाने हा विजय साकारला. या विजयासह अर्जेटिनाने ‘ब’ गटात उरुग्वे आणि पॅराग्वेला पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले. विजय मिळवला असला तरी अर्जेटिनाला जमैकाला निष्प्रभ करता आले नाही.
‘‘हा विजय समाधानकारक नाही. आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जेतेपद पटकवायचे असेल तर आम्हाला कामगिरीत प्रचंड सुधारणा करावी लागेल,’’ असे अर्जेटिनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिन्हो यांनी सांगितले. दुसरीकडे पराभव झाला असला तरी अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाला दिलेली टक्कर जमैकासाठी आत्मविश्वास उंचावणारी आहे.
अन्य लढतीत, उरुग्वेला पॅराग्वेविरुद्ध एका गुणाची आवश्यकता होती. उरुग्वेतर्फे जोस मारिआ गिमेनेझने २९व्या मिनिटाला गोल केला. पॅराग्वेतर्फे ल्युकास बारिओसने ४४व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी बचावावर भर दिला. पॅराग्वेचे बाद फेरीतील स्थान आधीच सुरक्षित झाले होते. ब्राझीलला नेयमारशिवाय दमदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina top group b after win over jamaica
First published on: 22-06-2015 at 02:51 IST