प्रो कबड्डी लीगच्या कक्षा यंदा रुंदावल्या. तीन वर्षांत कबड्डीच्या या लीगने लक्षणीय प्रगती करताना सर्वाना आश्चर्यचकीत केले. त्यामुळे यंदाच्या पाचव्या हंगामात १२ संघ, १३ आठवडे, ११ राज्य आणि एकंदर १३८ सामने असा प्रो कबड्डीचा आवाका वाढला. प्रो कबड्डीच्या या हंगामाला कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाचे तगडे आव्हान समोर होते. प्रो कबड्डीचा कालावधी वाढवणे योग्य की अयोग्य, यासंदर्भात कबड्डीमधील विविध जाणकारांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंचे मतप्रवाह आढळले. याचप्रमाणे मार्गदर्शक मंडळी आजही जुन्या सरावपद्धतीवर ठाम असल्यामुळे सामन्यांपेक्षा सरावाचा अतिताण खेळाडूंवर आला, असे मतसुद्धा या व्यासपीठावर व्यक्त करण्यात आले. तीन महिन्यांच्या स्पध्रेशिवाय त्याआधी दोन महिने सरावपूर्व शिबिर सुरू झाले. म्हणजे एकंदर पाच महिने खेळाडू या स्पध्रेसाठी कार्यरत होते. लीगचे वेळापत्रक कबड्डीपटूंसाठी मुळीच कठीण नव्हते, फक्त खेळाडू आणि मार्गदर्शकांची त्याला सामोरे जाण्याची मानसिक तयारी पुरेशी नव्हती, असा निष्कर्ष यातून निघाला.
कालावधी कमी झाल्यास खेळासाठी हितकारक!
प्रो कबड्डीने कालावधी वाढवल्यामुळे चांगल्या खेळाडूंपैकी बऱ्याचशा जणांना दुखापती झाल्या आहेत. प्रदीप नरवालसारखे काही खेळाडू मात्र दुखापतींचे आव्हान पेलूनही टिकले. या कालावधीमुळे स्थानिक स्पर्धावर गदा आली आहे. भारतीय कबड्डी संघाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा. कबड्डी एकीकडे वाढते आहे, परंतु तिची वाढ पूरक होत नाही. खेळाडू पैसे मिळतात म्हणून प्रो कबड्डीला प्राधान्य देतात, यात चुकीचे काहीच नाही. पण कालावधी कमी झाल्यास ते खेळासाठी हितकारक ठरेल. – सदानंद शेटय़े, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
खेळाडू व मार्गदर्शकांची मानसिक तयारी नव्हती!
प्रो कबड्डीत प्रत्येक खेळाडूला तीन महिन्यांत किमान २२ ते २६ सामने खेळायला मिळाले. संयोजकांनी ज्या पद्धतीने वेळापत्रक केले होते, ते पाहता कठीण काहीच नव्हते. घरच्या मैदानावरील सामने वगळता प्रत्येक सामन्याकरिता तीन दिवसांची विश्रांती असायची. शिवाय फिजिओ सोबत असल्याने दुखापतींवर मात करणे अवघड नव्हते. पूर्वी आम्ही चार दिवसांच्या अखिल भारतीय स्पर्धा खेळायचो. आताही अखिल भारतीय किंवा राष्ट्रीय स्पर्धा पाच दिवसांत होतात. या दिवसांत खेळाडूंना आठ सामने खेळावे लागतात. त्यामुळे कबड्डीसाठी हे नवे नाही. देशभरात संघटनांच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धाचे बरेच सामने खेळताना कुणीही तक्रार करीत नाही. मग खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती किंवा त्यांना त्रास होतो, हे कारण मला योग्य वाटत नाही. तीन महिन्यांच्या लीगसाठी आमची मानसिक तयारी नाही, हे मी मान्य करीन. एखादी लीग मोठी होत असेल, तर काही गोष्टी आपल्याला स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. – राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
उत्तरार्धात खेळाडूंचा जोश मावळला!
कबड्डी हा असा खेळ आहे, ज्यात एक सामना खेळलो तरी दमछाक होते. घरच्या मदानावरील सामने वगळता बऱ्याचशा सामन्यांना विश्रांती मिळते, परंतु खेळाडूंना सराव हा चालूच ठेवावा लागतो. सामन्यासाठीचा सराव वेगळ्या पद्धतीने चालतो. प्रो कबड्डीच्या उत्तरार्धात खेळाडूंचा जोश मावळल्याचे चित्र दिसत होते. प्रो कबड्डीचा कालावधी लांबल्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसादसुद्धा नंतर ओसरला. अशा परिस्थितीत तीन महिने लीग खेळवणे कितपत योग्य आहे? खेळाडूंना पैसा मिळाला आणि त्यांना तीन महिने खेळवून घेतले, इतकाच याचा निष्कर्ष निघावा हे अपेक्षित नाही. खेळाडूंनी प्रो कबड्डीच्या या हंगामात आपले नियोजन योग्य पद्धतीने केले. नितीन मदनेसारखा खेळाडू पहिल्या हंगामात ज्या पद्धतीने खेळला होता, तो खेळ दुखापतीतून सावरल्यानंतर यंदा दिसू शकलेला नाही. – माया आक्रे-मेहेर, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
प्रत्येक संघात मानसतज्ज्ञ हवा!
प्रो कबड्डीचे वेळापत्रक शारीरिकदृष्टय़ा आव्हानात्मक कदाचित नसेल, पण मानसिकदृष्टय़ा नक्की आहे. प्रो कबड्डीतून आर्थिक कमाईचा भाग असल्यामुळे कारकीर्दीचा तो भाग झाला. त्यामुळे मानसिकतेचे कारणसुद्धा इथे लागू पडत नाही. मुलांची एकदा परीक्षा सुरू झाली की, ती लवकर संपावी अशी त्यांची इच्छा असते. त्यामधील काही दिवसांचा रिक्त काळ हा त्यांना रुचत नाही, कारण त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही. इतका काळ सतत स्वत:ला प्रेरित होणे, ही सोपी गोष्ट नाही. यात प्रशिक्षक आणि संघसहकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक संघात मानसतज्ज्ञ असण्याची आवश्यकता असते. स्पर्धा जशी जवळ येत जाते, तसा सरावाचा स्तर उंचावायला हवा. मग स्पर्धाच्या काही दिवस अगोदर तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित व्हायला हवे. स्पर्धा चालू असताना रिक्त दिवसांत कौशल्याच्या सरावाची आवश्यकता नसते, तर रणनीती आखण्यावर अधिक वेळ द्यायला हवा. हे स्पर्धात्मक तंत्र आपल्याकडे अजून पुरेसे रुजलेले नाही. – डॉ. नीता ताटके, क्रीडा मानसतज्ज्ञ
संघासोबत अनुभवी डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट असायला हवा!
माझ्या शरीराला किती ताण सहन करायचा आहे, त्याची तयारी करायची असते. नऊ महिने व्यवस्थित तयारीला गेले, तर तीन महिन्यांच्या एखाद्या लीगमध्ये एकापाठोपाठ सामने खेळायला काहीच हरकत नाही. या कालावधीत प्रत्येक संघासोबत उत्तम डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट असायला हवा. या संघांसोबत बऱ्याचदा नवखे किंवा विद्यार्थी फिजिओ असतात. कारण दोन-तीन महिन्यांच्या कालावधीसाठी संघासोबत दगदग करणे कोणत्याही जाणकाराला जमणार नाही. त्यामुळे फिजिओपेक्षा खेळाडूचा लाभ महत्त्वाचा मानायला हवा. सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा खेळाडूच्या शरीराची दहा पटीने अधिक काळजी घ्यावी लागते. मग हे खेळाडू स्पर्धा चालू असताना दुखापतींसह खेळतात आणि ती संपल्यावर अनुभवी फिजिओकडे येतात. मग खेळाडूंकडून अननुभवी फिजिओने केलेल्या मार्गदर्शनाचे किस्से ऐकताना त्याचे गांभीर्य लक्षात येते. मग याच दुखापती खेळाडूंना आयुष्यभर वेदना देतात. – डॉ. डायना पिंटो, फिजिओथेरपिस्ट
बऱ्याचशा खेळाडूंवर अतिसरावाचा ताण!
प्रो कबड्डीची लीग तीन महिने चालली, त्याआधी दोन महिने सर्व संघांचे हंगामपूर्व सराव शिबीर झाले म्हणजे स्पध्रेशी निगडित खेळाडू आणि साहाय्यक मार्गदर्शकांसाठी हा कालावधी एकंदर पाच महिन्यांचा होता. एवढय़ा कालावधीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे आणि सामन्याकरिता सज्ज ठेवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला बरीच मेहनत घ्यावी लागली. कोणत्याही खेळातील खेळाडूला पाच महिने तंदुरुस्ती जपून फॉर्मात राहणे आव्हानात्मक ठरेल. खेळात चढउतार येतच राहतील. प्रो कबड्डीच्या संयोजकांनी वेळापत्रक आखताना खेळाडूंना आराम मिळावा, याकरिता पुरेसा वेळ दिला होता. मात्र या विश्रांतीच्या दिवसांत दररोज सराव व्हायलाच हवा, अशी प्रशिक्षकांची धारणा आहे. क्रिकेटमध्ये अशा विश्रांतीच्या दिवसात सराव सत्रे हलकीफुलकी असतात. कबड्डीमधील प्रशिक्षक अजूनही जुन्या पद्धतीने विचार करतात. त्यामुळे विविध क्षेत्ररक्षणानुसार चढाया हा सराव नेमाने चालतो. परिणामी खेळाडू सामन्यांपेक्षा सरावानेच अधिक थकतो. बऱ्याचशा खेळाडूंवर अतिसरावाचा ताण दिसत होता. तीन महिन्यांचा काळ बहुतांशी खेळाडूंना शारीरिकदृष्टय़ा पेलवला, मात्र मानसिकदृष्टय़ा त्यांना ते आव्हानात्मक ठरले. पाच महिने घरापासून आणि नियमित आयुष्यापासून दूर राहणे, हे खेळाडू आणि मार्गदर्शकांना कठीण गेले. त्यामुळे खेळ आवडतो, म्हणून तो मोठय़ा प्रमाणात खेळवला जाताना या काही गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. – संग्राम मांजरेकर, कबड्डी सरावतज्ज्ञ
