पाकिस्तानचे वादग्रस्त पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाच वर्षांची बंदी घातली आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब करणे आणि खेळाची प्रतिमा डागाळल्याप्रकरणी शिस्तपालन समितीने रौफ यांना दोषी ठरवले आहे.
५९ वर्षीय रौफ हे आयसीसीचे एलिट पॅनेल पंच म्हणून गणले जायचे. त्यांनी कसोटी सामन्यांतही पंचगिरी केली आहे. २०१३च्या आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या काही सट्टेबाजांकडून रौफ यांनी महागडय़ा भेटी स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
रौफ यांच्याबाबत निर्णय देण्यास समितीला बराच विलंब झाला. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील समितीने अखेर शुक्रवारी बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या समितीमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे. रौफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्यानंतर पाकिस्तानने त्यांची आयसीसीच्या एलिट पॅनेलवरून हकालपट्टी केली होती.
‘‘असद रौफ यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंचगिरी, खेळणे आणि क्रिकेटविषयक कोणत्याही उपक्रमात सहभागी होता येणार नाही. रौफ समितीसमोर हजर राहू शकले नाही. मात्र १५ जानेवारी २०१६ या दिवशी प्राथमिक माहिती आणि ८ फेब्रुवारी २०१६ला लिखित निवेदन त्यांनी सादर केले होते,’’ असे बीसीसीआयने बैठकीनंतर स्पष्ट केले आहे.
रौफ यांचे लिखित निवेदन आणि चौकशी समितीचा अहवाल यावरील चर्चेनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आचारसंहितेच्या कलम २.२.२, २.३.२, २.३.३ आणि २.४.१ यांचा रौफ यांनी भंग केल्याचे सिद्ध झाले आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीला सामना किंवा स्पध्रेसंदर्भातील अंतर्गत माहिती पुरवल्याच्या आरोपासंदर्भातही रौफ यांना दोषी ठरवण्यात आले होते.
२०१३च्या स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी दोषी सापडलेला हरयाणाचा ऑफ-स्पिनर अजित चंडिलावर गेल्या महिन्यात बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे. याचप्रमाणे सहकारी खेळाडूला भ्रष्टाचारास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबईचा फलंदाज हिकेन शाहवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

पुराव्याशिवायच माझ्यावर कारवाई -रौफ
मुंबईस्थित न्यायालयाने माझ्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पोलिसांना स्पष्टपणे सांगितलेले असतानाही माझ्यावर बंदी घालण्याचा अधिकार बीसीसीआय तसेच आयपीएल प्रशासनानला कोणी दिला? बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासनाने चौकशी आयुक्ताची नेमणूक केली. आयपीएलमधील पंचगिरीचे काम अर्धवट सोडून मी पळ काढला, असा आरोप करण्यात आला. पण यात काहीच तथ्य नाही. माझे काम पूर्ण केल्यानंतर एका दिवसाने मी परतलो. आयुक्त रवी सवानी यांनी घटनेची शहानिशा न करता माझ्याविरोधात आरोप केले. विधितज्ज्ञाच्या माध्यमातून चौकशी प्रक्रियेकरिता वकिलासह मुंबईला येऊन सहकार्य करण्याची तयारी असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. पण वकिलासह येण्यास त्यांनी सहमती दर्शवली नाही. यासंदर्भात मी बीसीसीआयला नोटीस बजावणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सहकार्य न केल्यास मी वैयक्तिकपणे लढा देईन.

Story img Loader