आशिया खंडातील ‘शेर’ कोण, हे पाहण्यासाठी आशिया चषकाची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली असेल. यंदा आशिया चषकाचे १२ वे वर्ष असून उद्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेता पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये होणार असून पराभवाच्या दुष्काळात सापडलेला भारतीय संघ विजयाच्या शोधात या स्पर्धेत उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाला एकही एकदिवसीय सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी आसुसलेला असेल. संघाचे कर्णधारपदही बदलण्यात आले असून महेंद्रसिंग धोनीच्या जागी आलेला विराट कोहली संघाला विजयपथावर नेतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताचा पहिला सामना २६ फेब्रुवारीला बांगलादेशबरोबर होणार आहे, तर दुसरा सामना श्रीलंकेबरोबर २८ फेब्रुवारीला होईल. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्ताशी भारतीय संघ २ मार्चला भिडणार असून ५ मार्चला अफगाणिस्तानशी सामना होणारआहे.
गतविजेता पाकिस्तानच्या संघापुढे सलामीच्या लढतीत आव्हान असेल ते श्रीलंकेचे. श्रीलंकेच्या संघात या वेळी तडफदार सलामीवीर तिलकरत्ने दिलशान नसेल, पण महेला जयवर्धने आणि कुमार संगकारासारखे अनुभवी फलंदाज संघात आहे, तर अँजेलो मॅथ्यूजसारखा अष्टपैलू खेळाडू श्रीलंकेसाठी हुकमी एक्का असेल. पाकिस्तानच्या संघाकडे उमर गुलसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज आहेच, त्याचबरोबर त्याला साथ देणारा युवा गोलंदाज पाकिस्तानकडे आहे.
आशिया चषकाचे वेळापत्रक
दिनांक सामना ठिकाण
२५ फेब्रुवारी पाकिस्तान वि. श्रीलंका फतुल्लाह
२६ फेब्रुवारी बांगलादेश वि. भारत फतुल्लाह
२७ फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. पाकिस्तान फतुल्लाह
२८ फेब्रुवारी भारत वि. श्रीलंका फतुल्लाह
१ मार्च बांगलादेश वि. अफगाणिस्तान फतुल्लाह
२ मार्च भारत वि. पाकिस्तान ढाका
३ मार्च अफगाणिस्तान वि. श्रीलंका ढाका
४ मार्च बांगलादेश वि. पाकिस्तान ढाका
५ मार्च अफगाणिस्तान वि. भारत ढाका
६ मार्च बांगलादेश वि. श्रीलंका ढाका
८ मार्च अंतिम फेरी ढाका
आशिया चषकातील आतापर्यंतची विजेतेपदे
भारत (५) : १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०.
श्रीलंका (४) : १९८६, १९९७, २००४, २००८.
पाकिस्तान (२) : २००२, २०१२.
आशिया चषकातील सर्वाधिक धावा : सनथ जयसूर्या (१२२०, श्रीलंका).
आशिया चषकातील सर्वाधिक बळी : मुथय्या मुरलीधरन (३०, श्रीलंका).
सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २