सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर मात केल्यानंतर, बांगलादेशने आशिया चषकाची मोठ्या दिमाखात सुरुवात केली आहे. मात्र पहिल्या सामन्यातील विजयानंतर बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर तमिम इक्बाल हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर गेला आहे. तमिमच्या हाताला झालेली दुखापत बरी होण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : बांगलादेशची श्रीलंकेवर १३७ धावांनी मात

श्रीलंकेविरुद्ध सामन्यात फलंदाजी करत असताना तमिमच्या हाताला दुखापत झाली होती. यानंतर तमिमने मैदानातून बाहेर पडणं पसंत केलं. मात्र इतर फलंदाज माघारी परतल्यानंतर तमिम इक्बाल एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याच्या या लढवय्या वृत्तीचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत होतं. अखेरच्या विकेटसाठी तमिम मैदानात उतरल्यामुळे बांगलादेशने २६१ धावांपर्यंत मजल मारली होती. आशिया चषकात बांगलादेशचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018: लढवय्या! दुखापतीनंतरही तमिम इक्बालने एका हाताने केली फलंदाजी