सिल्हेट : भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून गुरुवारी थायलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यातही निर्विवाद वर्चस्व राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने या स्पर्धेच्या सहापैकी पाच सामन्यांत विजय मिळवले, तर केवळ पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. थायलंडविरुद्धच्या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने साखळी सामन्यात थायलंडला अवघ्या ३७ धावांत गुंडाळले होते. त्यानंतरही थायलंडने गतविजेत्या बांगलादेशला मागे टाकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेसाठी पात्र ठरून उपांत्य फेरी गाठल्यानंतर आता आगेकूच सुरू ठेवण्यासाठी थायलंडचा संघ उत्सुक आहे. त्याच वेळी पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुसऱ्या फळीतील खेळाडूंची क्षमता तपासून पाहण्याची भारतासमोर यापेक्षा दुसरी योग्य वेळ नाही.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या स्पर्धेच्या सहापैकी केवळ तीन सामन्यांत खेळली आहे. मात्र, तिच्या अनुपस्थितीतही भारताचे चांगली कामगिरी सुरू ठेवली. आतापर्यंत भारतीय व्यवस्थापनाने किरण नवगिरे, दयालन हेमलता अशा पर्यायांचा विचार केला. मात्र, या दोघींना प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय संघ पुन्हा युवकांना अधिक संधी देणार की अंतिम सामन्याच्या दृष्टीने आपल्या आघाडीच्या खेळाडूंवर अवलंबून राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारताच्या फलंदाजीची भिस्त स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मावर असेल. दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी करताना भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • वेळ : सकाळी ८.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup cricket tournament indian women team match against thailand semi final today ysh
First published on: 13-10-2022 at 00:02 IST