AFG vs HK Asia Cup 202 1st Match Highlights in marathi: अफगाणिस्तानच्या संघाने हाँगकाँगवरील विजयासह आशिया चषक २०२५ मधील आपलं खातं उघडलं आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर हाँगकाँगचा संघ फार काळ टिकू शकला नाही आणि अफगाणिस्तानने ९४ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. हा मोठा विजय गुणतालिकेत अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा ठरला.

प्रथमच आशिया चषक खेळत असलेला हाँगकाँग संघाने अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी हाँगकाँगचे फलंदाज मात्र फेल ठरले. संघाच्या दोनच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. त्यापैकी ९ फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले.

रशीद खानने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान हे विस्फोटक फलंदाज स्वस्तात माघारी परतले. यानंतर सदिकउल्लाह अटलने मोहम्मद नबीसह भागीदारी रचत संघाचा डाव पुढे नेला. अटलने ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर नबीने २६ चेंडूत ३चौकार आणि एका षटकारासह ३३ धावांची खेळी केली.

अझमतुल्लाह उमरझाईने वादळी खेळी खेळत फक्त २० चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि ५३ धावा केल्या. त्याने २५२.३८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २ चौकार आणि ५ षटकार मारले. हाँगकाँगकडून किंचित शाह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकांत २४ धावा देत २ बळी घेतले. आयुष शुक्लानेही २ बळी घेतले. पण त्याने ४ षटकांत ५४ धावा दिल्या. याशिवाय अतिक इक्बाल आणि एहसान खान यांनीही प्रत्येकी १ बळी घेतला.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी

१८८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्यांनी पॉवरप्लेमध्येच हाँगकाँगच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर हाँगकाँग संघ या सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. हाँगकाँगचा निम्मा संघ फक्त ४३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि २० षटकांत १०० धावाही करू शकला नाही.

हाँगकाँगने २० षटकांत ९ गडी गमावून ९४ धावा केल्या. बाबर हयातने सर्वाधिक ३९ धावा केल्या, त्याच्याशिवाय इतर कोणताही खेळाडू २० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि फजलहक फारुकी यांनी २-२ बळी घेतले. अझमतुल्ला उमरझाई, रशीद खान आणि नूर अहमद यांनीही १-१ बळी घेतला.