Bangladesh vs Hongkong, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात हाँगकाँग आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनसामने आले होते.या सामन्यात हाँगकाँगने बांगलादेशसमोर विजयासाठी १४४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने ७ गडी राखून विजयाची नोंद केली आहे.
या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झीशान अलीने ३० धावांची खेळी करून दमदार सुरूवात करून दिली. अंशुमन राठने ४ धावा केल्या. त्यानंतर बाबर हयातने १४ धावांचे योगदान दिले. मधली फळी सांभाळताना निझाकत खानने ४० चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर कर्णधार यासीम मुर्तजाने २८ धावांचे योगदान दिले. यासह हाँगकाँगला २० षटकांअखेर ७ गडी बाद १४३ धावा करता आल्या.
बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १४४ धावांची गरज होती. बांगलादेशकडून डावाची सुरूवात करताना परवेज हुसेन इमोन आणि तांझीद हसन तमीम या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या २४ धावा जोडल्या. परवेज १९ तर तांझीद अवघ्या १४ धावा करून माघारी परतला.संघाचा कर्णधार लिटन दास शेवपर्यंत उभा राहिला. त्याने तौहीद हृदॉयसोबत मिळून १०० हून अधिक धावांची भागीदारी केली आणि बांगलादेशला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. लिटन दासने या डावात फलंदाजी करताना ५९ धावांची खेळी केली. तर तौहीद हृदॉय ३५ धावांवर नाबाद राहिला. यासह बांगलादेशने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
या विजयासह बांगलादेशने या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. यासह बांगलादेशने गुणतालिकेत २ गुणांची कमाई केली आहे. तर हाँगकाँगचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला आहे. बांगलादेशचा पुढील सामना १३ सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. तर आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेला हाँगकाँगचा संघ देखील १५ सप्टेंबरला होणाऱ्या पुढील सामन्यात श्रीलंकेचा सामना करताना दिसेल.