रोहिणी राऊत प्रकरणातून धडा घेत अ‍ॅथलेटिक्स संघटनेने कंबर कसली
आंतरराष्ट्रीय महिला धावपटू रोहिणी राऊत उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळून आल्याने धावपटूंच्या क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे अ‍ॅथलेटिक्सच्या गौरवशाली परंपरेला एक प्रकारे धक्काच बसल्याचे बोलले जात आहे. मात्र भविष्यात नवोदित धावपटूंना अशा प्रकारच्या उत्तेजक द्रव्य सेवनापासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनने कंबर कसली असून यासंदर्भात प्रथमच शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली येथे फेब्रुवारीत झालेल्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत रोहिणी राऊतने उत्तेजक द्रव्य घेतल्याची घटना उघडकीस आली. रोहिणीने स्नायूंच्या बळकटीसाठी उत्तेजक घेतले असल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेस कळवताच संघटनेचे धाबे दणाणले. २६ एप्रिलला राज्य संघटनेच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत रोहिणी राऊतने उत्तेजक घेतल्यासंबंधी कबुली दिली. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंच्या भविष्याची चिंता राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेला सतावत आहे. रोहिणीच्या उत्तेजक सेवनाची चर्चा नवोदित अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंमध्ये जोरात सुरू आहे.
या परिस्थितीत धावपटूंना उत्तेजकांपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रशिक्षकांसाठी अशाप्रकारची शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
प्रशिक्षक व खेळाडूंना एकत्र शिबिरात बोलावून त्यांना याचे दुष्परिणाम सांगण्यात येणार आहेत अथवा अशाप्रकारच्या उत्तेजकापासून सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळींकडून दिला जाणार आहे. शिबिरात आहार कसा असावा, या संदर्भातदेखील मार्गदर्शन दिले जाणार आहे. तीन दिवसांचे हे शिबीर असून यामध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्य़ासह विदर्भाचा समावेश असल्याची महिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशिक्षकांना उत्तेजकासंबंधी निमयांची आम्ही वारंवार आठवण करून देत असतो. मात्र प्रथमच उत्तेजकापासून दूर राहण्यासाठी आम्ही शिबिरामध्ये खेळाडूंचाही समावेश करीत आहोत. यासाठी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये आहारावरदेखील आम्ही भर देणार असून भविष्यातील नवोदित खेळाडूंना नियमांचा परिचय हा मुख्य उद्देश राहणार आहे.
– शरद सूर्यवंशी, सहसचिव, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athletics association organized camp for the first time to stay away from the stimulant drugs
First published on: 28-04-2016 at 02:35 IST