Australia vs South Africa, WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला आहे. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला आहे. या डावात कगिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेकडून पाच गडी बाद केले आहेत.
या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजाची जोडी मैदानात आली. या जोडीला ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. उस्मान ख्वाजा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर कॅमरून ग्रीन अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. कगिसो रबाडाने या दोन्ही फलंदाजांना एकाच षटकात बाद करत माघारी धाडलं.पहिल्यांदाच सलामीला आलेल्या मार्नस लाबुशेनला अवघ्या १७ धावा करता आल्या. या डावात ट्रॅव्हिस हेडही स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या ११ धावा करता आल्या.
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला ४ मोठे धक्के बसले. पण दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. ब्यू वेबस्टर आणि स्टिव्ह स्मिथने मिळून ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. मात्र,एडेन मार्करमने स्टिव्ह स्मिथला ६६ धावांवर माघारी धाडत ही भागीदारी तोडली.
ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. त्याला कगिसो रबाडाने बाद करत माघारी धाडलं. अॅलेक्स कॅरीने २३ धावांची खेळी केली. तर कर्णधार पॅट कमिन्स १, मिचेल स्टार्क १ आणि नॅथन लायन शून्यावर माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेकडू गोलंदाजी करताना कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्याने १५.४ षटकात ५१ धावा खर्च करत उस्मान ख्वाजा, कॅमरून ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला बाद करत माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
या सामन्यासाठी अशी आहे दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:
एडन मार्करम, रायन रिकल्टन, वियान मल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंघम, काइल वेरेयने (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅ्व्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवूड