Australian Cricketer Bob Simpson Dies: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि कोच बॉब सिम्पसन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात पुनरागमन केलं होतं. क्रिकेट जगतात वर्चस्व गाजवत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या यशात सिम्पसन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
सिम्पसन यांची कसोटी कारकीर्द दोन दशकांहून अधिक काळ टिकली. १९८७ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला तेव्हा ते संघाचे प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर १० वर्षांनी वयाच्या ४१ व्या वर्षी बॉब सिम्पसन ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतले. त्यांनी १९५७ ते १९७८ दरम्यान ६२ कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी ४८६९ कसोटी धावा केल्या आणि ७१ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या नेतृत्वाखालील ३९ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने जिंकले.
१९६८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, बॉब सिम्पसन यांना १९७७ मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी क्रिकेट संघात परतण्यास राजी करण्यात आले, जेव्हा वर्ल्ड सिरीज क्रिकेटमुळे संघ विखुरला गेला. त्यांने आणखी १० कसोटी सामने खेळले आणि दोन शतकं केली.
१९६४ मध्ये ओव्हलवर पहिलं कसोटी शतक झळकावून सिम्पसनने यांनी अनेक विक्रम मोडले आणि सात वर्षांचा दुष्काळ संपवला. १३ तासांहून अधिक काळ फलंदाजी करत, सिम्पसन यांनी त्यांचं पहिलं शतक त्रिशतकात (३११) रूपांतरित केले. सिम्पसन हे त्रिशतक करणारे पहिले कसोटी कर्णधार होते. कसोटीत ३०० धावा करणारे सर्वात तरुण कर्णधार म्हणून सिम्पसन यांचा विक्रम ६१ वर्षांहून अधिक काळ टिकला.
ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कोचचं निधन
१९७८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, सिम्पसन १९८६ ते १९९६ दरम्यान ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक होते. यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले. १९८७ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा ते संघाचे प्रशिक्षक होते. सिम्पसन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात, १७ वर्षांच्या दुष्काळानंतर १९९५ मध्ये ऑस्ट्रेलियाने फ्रँक वॉरेल ट्रॉफी परत मिळवली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका फ्रँक वॉरेल ट्रॉफी म्हणून ओळखली जाते.
रणजी ट्रॉफी आणि टीम इंडियाशी काय होतं कनेक्शन?
२००६ मध्ये सिम्पसन यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये आणि २०१३ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. १९९० च्या दशकात सिम्पसन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणूनही काम केले होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी राजस्थान क्रिकेट संघासाठी काही काळासाठी हीच भूमिका बजावली होती.