अबू धाबी : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अस्सल थराराला शनिवारपासून प्रारंभ होईल. अबू धाबी येथे होणाऱ्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आमनेसामने येणार असून आफ्रिकेच्या वेगवान त्रिकुटाविरुद्ध ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कशी कामगिरी करते, यावरच सामन्याचा निकाल लागेल.

विश्वचषकापूर्वी झालेल्या चार मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला अनुक्रमे भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी हरवले. त्याशिवाय सराव लढतीतही त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे आफ्रिकेला फॅफ ड्यूप्लेसिस, इम्रान ताहिर, एबी डीव्हिलियर्स या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका जाणवू शकतो. मात्र सराव सामन्यांत अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना नमवल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला असून यंदा ते मोक्याच्या क्षणी कच खाणारा (चोकर्स) संघ अशी ओळख मिटवण्यासाठी उत्सुक असतील.