Australia U-19 Team Announces Squad vs India u19 team: कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखालील भारताच्या १९ वर्षांखालील पुरुष संघाने इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. युथ टेस्ट आणि वनडे मालिकेत भारताच्या संघाने विजय मिळवला. विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीसह इतरही खेळाडूंनी आपल्या कामगिरीची छाप पाडली. यानंतर आता भारतीय अंडर-१९ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान भारताविरूद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंची निवड झाली आहे.

भारत अंडर-१९ संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सप्टेंबर महिन्यात असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ युथ वनडे आणि २ युथ टेस्ट सामने खेळवले जातील. भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघाची घोषणा मात्र करण्यात आली आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील पुरुष संघात भारतीय वंशाचे दोन युवा क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहेत. व्हिक्टोरियाचा आर्यन शर्मा आणि न्यू साउथ वेल्स संघाचा यश देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यात २१ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ब्रिस्बेन आणि मॅके येथे तीन ५० षटकांचे सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या युवा निवड समितीने १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर १९ पुरुष विश्वचषकाची तयारी म्हणूनही हे सामने महत्त्वाचे असतील. अंडर-१९ विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक टिम निल्सन यांची १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच मालिका असेल. त्यांनी यापूर्वी २००७ ते २०११ पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ पुरुष संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.

भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील पुरुष संघ

सायमन बज, अ‍ॅलेक्स टर्नर, स्टीव्ह होगन, विल मलाझुक, यश देशमुख, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, चार्ल्स लॅचमंड, बेन गॉर्डन, विल बायरम, केसी बार्टन, अ‍ॅलेक्स ली यंग आणि जेडेन ड्रेपर.

राखीव खेळाडू: जेड हॉलिक, टॉम पॅडिंग्टन आणि ज्युलियन ऑस्बोर्न.

भारत अंडर १९ वि. ऑस्ट्रेलिया अंडर १९ मालिकेचं वेळापत्रक

२१ सप्टेंबर: पहिला युथ वनडे सामना, इयान हिली ओव्हल, ब्रिस्बेन, दुपारी २:३० वाजता

२४ सप्टेंबर: दुसरा युथ वनडे सामना, इयान हिली ओव्हल, ब्रिस्बेन, दुपारी २:३० वाजता

२६ सप्टेंबर: तिसरा युथ वनडे सामना, इयान हिली ओव्हल, ब्रिस्बेन, दुपारी २:३० वाजता

३० सप्टेंबर-३ ऑक्टोबर: पहिला चार दिवसीय सामना, इयान हिली ओव्हल, ब्रिस्बेन, सकाळी १० वाजता

७-१० ऑक्टोबर: दुसरा चार दिवसीय सामना, ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके, सकाळी ११ वाजता