२०१८ साल हे भारतीय क्रिकेट संघासाठी चांगलं गेलं. घरचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिकाही जिंकली. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हा फॉर्म अतिशय चांगला असल्याने, अनेकांनी भारताला विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं होतं. मात्र घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेतही पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतरही भारतीय संघाचं मनोधैर्य कमी झालेलं नसल्याचं वक्तव्य विराट कोहलीने केलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचं मत, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ऑस्ट्रेलियाचा संघ संपूर्ण मालिकेत भारतापेक्षा सरस खेळला यात काही वादच नाही. ऑस्ट्रेलियाचा हा संघ विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार ठरु शकतो. माझ्यामते विश्वचषकाआधी भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा आहे.” India TV वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलत असताना सौरव गांगुलीने आपलं मत मांडलं. यावेळी बोलत असताना सौरव गांगुलीने विश्वचषकात कोणत्याही संघाला हलकं लेखणं योग्य ठरणार नसल्याचंही म्हटलं आहे. “भारतीय संघाने या मालिकेत भरपूर प्रयोग केले आहेत. भारताचा सध्याचा संघ खूप चांगला आहे. विश्वचषकासाठी अजुनही बराच कालावधी आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी आपल्या खेळाडूंना कामगिरीत सातत्य आणण्याची गरज आहे. फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाने मला जुन्या ऑस्ट्रेलिया संघाची आठवण करुन दिली. जुना ऑस्ट्रेलिया संघ भारतात येऊन भारताला हरवत होता.”

विश्वचषकाआधी टीम इंडियाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय वन-डे मालिका होती. यानंतर २३ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील. अखेरच्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने, विश्वचषकासाठी भारतीय संघ जवळपास निश्चीत झाला असून एका जागेसाठी विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूला विश्वचषकाचं तिकीट मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia series defeat a wake up call for virat kohli and co ahead of world cup says sourav ganguly
First published on: 15-03-2019 at 12:52 IST