केर्न्‍स : न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या  सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने केली आहे.

जूनमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ६२ धावांच्या खेळीनंतर ३५ वर्षीय फिंच धावांसाठी झगडत आहे. त्याची सध्याची धाव सरासरी ३.७ धावा अशी असून, यापैकी तीनदा तो शून्यावर बाद झाला आहे. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी फिंच हाच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेने म्हटले आहे.

‘‘ही वाटचाल अप्रतिम होती. यातील अनेक आठवणी संस्मरणीय आहेत,’’ असे फिंचने सांगितले. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आता ऑस्ट्रेलियाला नवा कणखर कर्णधार शोधावा लागणार आहे. फिंचने १४५ एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून, यापैकी ५४ सामन्यांत नेतृत्व केले.

सामने : १४५

धावा : ५४०१

सर्वोत्तम : १५३*

सरासरी : ३९.१३

१००/५० : १७/३०