भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील वर्षी कानपूर येथे होणारा कसोटी सामना हैदराबाद येथे खेळविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियन निरीक्षण समितीने कानपूर येथील मैदानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना आयोजित केला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानाची पाहणी करण्याकरिता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निरीक्षकांनी नुकतीच भेट दिली. त्यांची भेट होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर येथील एका संस्थेने शासनाची परवानगी घेऊन एक लाख मुला-मुलींचा राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी मैदानाचे थोडेसे नुकसान झाले असल्याचे व त्याची दुरुस्ती नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्याबरोबर या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. हा सामना कानपूर येथून अन्यत्र घेऊ नये असे त्यांनी मंडळास लिहिले असल्याचे समजते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार जर दौऱ्यावर येणाऱ्या संघांच्या निरीक्षण समितीने मैदानाबाबत नाराजी व्यक्त केली असेल तर स्थानिक क्रिकेट समिती परदेशी संघावर आपला निर्णय लादू शकत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निरीक्षकांनी कानपूर येथील हॉटेल सुविधांबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. स्टेडियमचे नूतनीकरण, खेळाडूंची ड्रेसिंग रूम याबाबतही ते असमाधानी आहेत. या निरीक्षण समितीत पाच सदस्यांचा समावेश होता. त्यांच्यासमवेत भारतीय क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट विकास व्यवस्थापक सुरू नायक उपस्थित होते.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे सरव्यवस्थापक रोहित तलवार यांनी सांगितले, आम्हाला नूतनीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल अशी खात्री वाटत आहे. हा सामना कानपूर येथेच होईल.