बांगलादेश क्रिकेट बोर्डाने माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडू रसेल डॉमिंगो यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. डॉमिंगो यांनी माईक हेसन, पॉल फारब्रेस, ग्रँट फ्लॉवर यांना मागे टाकत शर्यतीत बाजी मारली. ४४ वर्षीय डॉमिंगो २१ ऑगस्टरोजी आपला पदभार स्विकारतील. आगामी २ वर्षांसाठी डॉमिंगो यांच्यासोबत करार करण्यात आला आहे. याआधी डॉमिंगो यांनी २०१३ ते २०१७ या काळात आफ्रिकेच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं.

“आगामी दोन वर्षांच्या काळात रसेल बांगलादेश संघाला आपला पूर्ण वेळ देऊ शकणार आहे. याचसोबत त्यांचा अनुभव लक्षात घेता आम्ही त्यांची मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करत आहोत.” बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी माहिती दिली. गेल्या काही वर्षांत बांगलादेशच्या संघाने चांगली प्रगती केली आहे, हा संघ अनेकांना धक्का देण्याचं सामर्थ्य बाळगून आहे. त्यामुळे या नवीन खेळाडूंसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असं म्हणत डॉमिंगो यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत. डॉमिंगो स्टिव्ह ऱ्होड्स यांची जागा घेणार आहेत.