बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा ८ धावांनी दारूण पराभव केला आहे. यासह बांगलादेशने सुरूवातीचे २ सामने जिंकत मालिका २-० ने आपल्या नावे केले आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानची अवस्था सामन्याच्या सुरूवातीला ५ बाद १७ धावा अशी होती.
बांगलादेश संघाने टी-२० सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला आहे. बांगलादेशने संपूर्ण २० षटकं खेळली आणि १३३ धावांवर सर्वबाद झाला. टी-२० सामना पाहता पाकिस्तानसाठी हे लक्ष्य सोपं होतं, परंतु पाकिस्तान संघ हे सोपं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. संपूर्ण संघ १९.२ षटकांत १२५ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा हा सलग दुसरा विजय आहे आणि त्यांनी २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पाकिस्तानने बांगलादेशला २० षटकांत १३३ धावांवर सर्वबाद केलं. बांगलादेशकडन सामन्यात ४८ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. तर मेहदी हसनने २५ चेंडूत ३३ धावा केल्या. त्याशिवाय इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. पाकिस्तानकडून सलमान मिर्झा, अहमद डानियल आणि अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
बांगलादेशने दिलेल्या १३४ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरूवात लाजिरवाणी झाली. पाकिस्तानचे टॉप-६ फलंदाज १० धावांचा आकडाही पार करू शकले नाही. तर ३ जण शून्यावर बाद झाले. पाकिस्तानने परिणामी अवघ्या १७ धावांवर ५ विकेट्स गमावले होते. सैम अयुब, मोहम्मद हरिस, हसन नवाज, फखर जमान, मोहम्मद नवाज लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ लवकरच सर्वबाद होणार अशी चिन्ह होती. पण फहीम अश्रफ संघासाठी तारणहार ठरला.
फहीम अश्रफने एका टोकाकडून संघाचा डाव उचलून धरत ३२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावा करत अर्धशतक झळकावलं. पण १९व्या षटकात तो क्लीन बोल्ड झाला आणि पाकिस्तानच्या विजयाचं स्वप्न भंगलं. फहीम अशरफच्या लढाऊ खेळीनंतरही, संघ १९.२ षटकांत १२५ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी, विशेषतः मेहदी हसन, मुस्तफिजूर रहमान आणि शोरीफुल इस्लाम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाला विजयाकडे नेले.