bangladesh woman captain Nigar Sultana statement: बांगलादेश महिला संघाची कर्णधार निगार सुल्ताना हिने ज्युनियर महिला क्रिकेटपटूंना मारहाण केल्याच्या आरोपांवर वक्तव्य केलं आहे. निगार सुल्तानाने हे आरोप फेटाळू न लावले आहेत. या आरोपांबाबत बोलताना भारताची वर्ल्डकप विजेती महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नावाचा उल्लेख केला आहे. यामुळे निगार सुल्ताना हिचं वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

बांगलादेश संघाची कर्णधार निगार सुलताना सध्या मोठ्या वादामध्ये अडकली आहे. संघातील वेगवान गोलंदाज जहानारा आलम हिने आरोप केला आहे की तिने संघातील ज्युनियर खेळाडूंशी गैरवर्तन केलं, इतकेच नव्हे तर त्यांना मारहाण करण्यापर्यंत गोष्ट गेल्याचं तिने सांगितलं. यावर बोलताना निगार सुल्तानाने हरमनप्रीत कौरच्या नावाचा उल्लेख केला.

२०२३ मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यात हरमनप्रीतला पायचीत बाद दिल्यानंतर रागाच्या भरात तिने स्टंप्सवर बॅट आपटली होती. नंतर, हरमनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात पंचांविषयीही वक्तव्य केलं होतं आणि ट्रॉफी फोटो सेशन दरम्यान बांगलादेशी खेळाडूंना टोमणे मारले होते.

बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानचं मारहाण प्रकरण नेमकं काय आहे?

सध्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जहांआरा आलमने अलीकडेच खुलासा केला होता की, ज्युनियर क्रिकेटपटूंनी तिला फोन करून सुलतानाने त्यांना मारहाण केल्याचा दावा केला होता. बांगलादेशच्या कर्णधाराने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आणि म्हटलं की जर असं घडलं असतं तर ज्युनियर खेळाडूंनी परदेशात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला फोन करण्याऐवजी इथे वरिष्ठांना कळवलं असतं.

बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना मारहाण करण्याच्या आरोपांवर म्हणाली, “मी कोणाला का मारेन? म्हणजे मी स्टंपवर बॅट मारेन तरी कशाला? मी हरमनप्रीत आहे का, की जी रागात स्टंपवर बॅट मारत फिरू? मी असं का करीन? माझ्या वैयक्तिक जीवनात मी स्वयंपाक करत असेन किंवा इतर काही करत असेन, मी इथे तिथे कुठेही बॅट आपटेन, मी हेल्मेटवर, पण हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे.

“पण मी इतरांबरोबर असं का करेन? कोणाला तरी मारहाण का करू? फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून मी मारहाण करतेय? तुम्ही इतर खेळाडूंनाही विचारू शकता किंवा टीममधल्या कुणालाही मी कधी असं काही केलं आहे का,” ती पुढे म्हणाली.