स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी नसला तरी आम्ही मोठय़ा फरकाने जिंकून दाखवू शकतो, हे बार्सिलोनाच्या खेळाडूंनी दाखवून दिले. २०१०-११ मोसमानंतर प्रथमच मेस्सी स्पॅनिश लीग सामन्याला मुकला, पण बार्सिलोनाने रिअल मलोर्काचा ५-० असा दणदणीत पराभव केला. रिअल माद्रिदनेही सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत लेव्हान्टेचा ५-१ असा पराभव करून थाटात विजयाची नोंद केली.
मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे मेस्सीने या सामन्यातून माघार घेतली. पण बार्सिलोनाने मोठय़ा फरकाने विजय मिळवून स्पॅनिश लीगमध्ये आपली आघाडी टिकवून धरली. बार्सिलोनाने रिअल माद्रिदला १३ गुणांच्या फरकाने मागे टाकून अव्वल स्थान कायम राखले आहे. मलोर्का संघ गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असला तरी त्यांना अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. सेस्क फॅब्रेगस, अ‍ॅलेक्सी सांचेझ तसेच आन्द्रेस इनियेस्टा यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने हा विजय साकारला. अर्सेनलकडून बार्सिलोनात दाखल झाल्यानंतर फॅब्रेगसने आपली पहिली हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने २०व्या, ३७व्या आणि ४६व्या मिनिटाला गोलाची नोंद केली. अ‍ॅलेक्सी सांचेझने २२व्या आणि ३८व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
रिअल माद्रिदने लेव्हान्टेचा ५-१ असा धुव्वा उडवून ६५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. झाबी अलोन्सोच्या क्रॉसवर गोन्झालो हिग्युएन याने या मोसमातील सर्वोत्तम गोल झळकावला. मायकेल बर्केरो याने ३१व्या मिनिटाला गोल करून लेव्हान्टेला आघाडी मिळवून दिली होती. पण त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. त्यानंतर रिअल माद्रिदने लागोपाठ पाच गोल लगावून लेव्हान्टेच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. रिअल माद्रिदकडून हिग्युएन, काका (३९व्या मिनिटाला), ख्रिस्तियानो रोनाल्डो (८४व्या मिनिटाला) आणि मेसूत ओझिल (८७व्या मिनिटाला आणि ९१व्या मिनिटाला) यांनी गोल झळकावले.