लेव्हरक्युसेनचा फ्लोरियन विट्र्झ गोल करणारा सर्वात युवा खेळाडू

बर्लिन : बायर्न म्युनिच आणि बोरुसिया डॉर्टमंड यांनी बुंडेसलिगा फुटबॉलमध्ये विजयांची नोंद करत अव्वल दोनमधील स्थाने भक्कम केली. बायर्नने अव्वल स्थानासह सलग आठव्या बुंडेसलिगा विजेतेपदाच्या घोडदौड कायम ठेवली.

बायर्नने पाचव्या स्थानी असलेल्या लेव्हरक्युसेनचा ४-२ असा सहज पराभव केला. ३० सामन्यांत ७० गुणांसह बायर्नने सात गुणांची आघाडी कायम ठेवली. डॉर्टमंडने घरच्या मैदानावर हर्था बर्लिनचा १-० पराभव करत दुसरे स्थान कायम ठेवले. डॉर्टमंडकडून एमरे कॅनने ५८व्या मिनिटाला गोल केल्याने त्यांना हर्थाला १-० नमवता आले.

बायर्नविरुद्धच्या लढतीत लेव्हरक्युसेनला पहिल्या १० मिनिटांत १-० आघाडी मिळवता आली होती. मात्र नंतर बचावपटूंकडून झालेल्या चुका लेव्हरक्युसेनच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. बायर्नकडून किंगस्ले कोमॉनने २७व्या मिनिटाला, लियॉन गॉट्झ्काने ४२वे मिनिट, सर्जी गिनार्बीने ४५वे मिनिट आणि रॉबर्ट लेव्हानडोवस्कीने ६६व्या मिनिटाला गोल केले. बायर्नचा विजय झाला असला तरी लेव्हरक्युसेनच्या फ्लोरियन विट्र्झने ८९व्या मिनिटाला गोल करून सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. १७व्या वर्षी गोल करणारा विट्र्झ बुंडेसलिगामधील सर्वात तरुण खेळाडू ठरला.

पुढील हंगामात स्थान टिकवण्यासाठी वर्डरला आता उर्वरीत लढतींत पराभव टाळावे लागणार आहे. मात्र त्यांचा रविवारी झालेल्या लढतीत वुल्फ्सबर्गकडून ०-१ पराभव झाला. वाऊट वेगहॉस्र्टने ८२ व्या मिनिटाला केलेला गोल वुल्फ्सबर्गच्या विजयात मोलाचा ठरला.

दुखापतीतून सुआरेझ सावरला

बार्सिलोना : स्पेनमध्ये ला-लिगा फुटबॉलला १३ जूनपासून सुरुवात होत असून बार्सिलोनाचा लुईस सुआरेझ दुखापतीतून सावरला आहे. सुआरेझ १२ जानेवारीला गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून फुटबॉल खेळलेला नाही. मात्र आता तो तंदुरुस्त झाल्याने बार्सिलोनाच्या १३ जूनला मॅर्लोकाविरुद्ध होणाऱ्या लढतीत खेळणार आहे. दरम्यान लिओनेल मेसीच्या समावेशाबाबत अद्यापही साशंकता कायम आहे.

* बुंडेसलिगामध्ये गोल करणारा सर्वात युवा खेळाडू

* वय १७ वर्षे आणि ३४ दिवस

* लेव्हरक्युसेनशी यावर्षीच करारबद्ध

* याआधीचा विक्रम नुरी साहिनच्या नावावर (२०१५मध्ये डॉर्टमंडकडून)

* साहिनचे विक्रमाच्यावेळेस वय १७ वर्षे आणि ८२ दिवस