द्विस्तरीय कसोटी सामन्यांच्या पद्धतीच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेला विरोध लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तो मागे घेतला आहे. भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश व झिम्बाब्वे यांनीही या प्रस्तावाला विरोध केला होता.

दुबई येथे विविध देशांच्या क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार होता. परंतु भारताच्या दबावाखाली आयसीसीला झुकावे लागले आहे.

याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘हा प्रस्ताव मागे घेण्याबाबत आम्ही आयसीसीला विनंती केली होती. ही विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आयसीसीचे आभारी आहोत.  प्रचलित पद्धतीद्वारेही कसोटी सामने लोकप्रिय होऊ शकतात. त्यामुळेच त्यात कोणताही बदल करू नये असे आमचे मत होते.’’

द्विस्तरीय कसोटी पद्धतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी मतदानाचे अधिकार असलेल्या दहा देशांपैकी किमान सात देशांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र भारतासह चार देशांनी विरोध केल्यानंतर आयसीसीला माघार घ्यावी लागली.

‘‘या प्रस्तावामध्ये काही त्रुटी आहेत. या प्रस्तावावर आणखी चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे आमच्या लक्षात आले आहे. क्रिकेटच्या तीनही स्वरूपांच्या सामन्यांबाबत प्रत्येक देशाला जाणीव आहे, हे पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटत आहे,’’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले.

 

दुलीप करंडकाच्या अंतिम फेरीत रोहित, धवन खेळणार

नवी दिल्ली : दुलीप करंडक स्पर्धेची अंतिम फेरी १० सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार असून यामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनसारख्या भारतीय कसोटी संघातील खेळाडूंचा समावेश असेल. या संघांत भारतीय संघामधील सहा खेळाडूंचा समावेश आहे.

संघ

इंडिया रेड : युवराज सिंग (कर्णधार), अभिनव मुकुंद, शिखर धवन, सुदीप चॅटर्जी, गुरकिरट सिंग मान, अंकुश बैन्स (यष्टीरक्षक), स्टुअर्ट बिन्नी, अक्षय वाखरे, कुलदीप यादव, अमित मिश्रा, नथ्थू सिंग, अनुरीत सिंग, इश्वर पांडे, नितीश राणा, प्रदीप सांगवान.

इंडिया ब्ल्यू : गौतम गंभीर (कर्णधार), मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, सिद्धेश लाड, दिनेश कार्तिक, परवेझ रसूल, सूर्यकुमार यादव, करण शर्मा, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा, पंकज सिंग, अभिमन्यू मिथून, शेल्डन जॅकसन, हनुमा विहारी.

 

इंडिया ब्ल्यू अंतिम फेरीत

ग्रेटर नोएडा : पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. इंडिया रेडविरुद्ध अंतिम फेरीचा सामना १० सप्टेंबरला सुरू होणार आहे. ब्ल्यू संघाने इंडिया ग्रीन संघापुढे ७६९ धावांचे अशक्यप्राय असे आव्हान ठेवले होते. अखेरच्या दिवशी ग्रीन संघाला ४ बाद १७९ धावा करता आल्या आणि सामना अनिर्णीत राहीला. ब्ल्यू संघाने पहिल्या डावात ७०७ धावांचा डोंगर रचत ग्रीन संघाला पहिला डाव २३७ धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात ब्ल्यू संघाने २९८ धावा करत ग्रीन संघापुढे ७६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यातील पहिल्या डावात १६१ आणि दुसऱ्या डावात ५८ धावा करणाऱ्या ब्ल्यू संघाच्या मयांक अगरवालला सामनावीराचा किताब देण्यात आला.

 

ओझाच्या डोक्याला दुखापत

ग्रेटर नोएडा : दुलीप करंडकाच्या इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन यांच्यातील सामन्यादरम्यान  फिरकीपटू प्रग्यान ओझाच्या डोक्याला दुखापत झाली. इंडिया ग्रीनकडून खेळताना ओझा मिडऑनला क्षेत्ररक्षण असताना चेंडू जमिनीवरून उसळला आणि ओझाच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर आदळला. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.