भारत करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळए पुन्हा एकदा देशातील सर्व क्रीडा उपक्रम नियंत्रणात आणले गेले आहेत. यंदा भारतात टी-२० क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे आणि बीसीसीआय या स्पर्धेची तयारी करीत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत या स्पर्धेचे आयोजन करेल. करोनाच्या कठीण परिस्थितीत या स्पर्धेच्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा तयार करण्यासाठी बीसीसीआयने २९ मे रोजी एक बैठक बोलावली आहे.

वर्ल्डकपसोबतच या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट हंगामावर (२०२१-२२) चर्चा होणार आहे. “देशातील करोनाचा प्रसार लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा २९मे रोजी होईल”, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

मागील हंगामात रणजी स्पर्धा खेळवण्यात न आल्याने बीसीसीआय यावर्षी सप्टेंबरपासून घरगुती हंगाम सुरू करण्याचा विचार करीत आहे. २०२०-२१च्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने होऊ शकते.