भारताच्या प्रशिक्षकपदांसाठी ‘बीसीसीआय’ने अर्ज मागवले

नवी दिल्ली : माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार हे जवळपास निश्चित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी औपचारिकता म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक आणि अन्य तीन साहाय्यक प्रशिक्षकांसाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख द्रविडने भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या अंतिम सामन्यादरम्यान दुबई येथे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी द्रविडसोबत चर्चा केली. या वेळी द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे ‘बीसीसीआय’ पदाधिकाऱ्यांना कळवले. मात्र, लोढा समितीच्या संविधानानुसार, प्रशिक्षकांची नेमणूक करताना ‘बीसीसीआय’ने क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) गठित करून या समितीने ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेला योग्य उमेदवाराची शिफारस करणे गरजेचे आहे. मुख्य प्रशिक्षकपदासह फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास २६ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

रविवारी प्रकाशित करणाऱ्या आलेल्या जाहिरातीनुसार, भारताच्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ २०२३ सालच्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत असणार आहे. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठीचे निकष काय?

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने खेळाडू म्हणून किमान ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामने खेळलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा या उमेदवाराकडे दोन वर्षे कोणत्याही राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण दिल्याचा अथवा तीन वर्षे ‘आयपीएल’ संघाचे मार्गदर्शन केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे. इतर पदांसाठीच्या अर्जदारांना १० कसोटी किंवा २५ एकदिवसीय सामने किंवा ‘आयपीएल’/‘अ’ संघासोबत किमान तीन वर्षे काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.